कल्याण – येथील रामबाग गल्ली क्रमांक तीनमध्ये एका टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका पाळीव श्वानाचा टेम्पोखाली येऊन मृत्यू झाला. याप्रकरणी पाळीव श्वानाच्या मालकाने टेम्पो चालकाविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सचिन दराडे (वाहन क्र. एमएच-०५-एझेड-०५१४) असे आरोपी टेम्पो चालकाचे नाव आहे. केदार करंबेळकर (२६, रा. ओम सदगुरू कृपा सोसायटी, रामबाग गल्ली क्र. ३, कल्याण पश्चिम) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते व्यावसायिक आहेत. केदार यांनी एक कुत्री पाळली होती. ती नियमित सोसायटी परिसरात फिरत असायची. गेल्या आठवड्यात रामबाग गल्ली क्रमांक तीनमधील सुजय आणि सुभाष इमारतीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर सचिन दराडे या चालकाचा टेम्पो उभा होता. या टेम्पोखाली केदार यांची पाळीव कुत्री बसली होती. चालक सचिन याने टेम्पोखाली कोणी आहे का, याची तपासणी न करता थेट टेम्पोत जाऊन टेम्पो मागे घेण्यास सुरुवात केली. यावेळी टेम्पोखाली बसलेल्या कुत्रीच्या पायावरून टेम्पोचे चाक जाऊन ती मोठ्याने विव्हळू लागली.

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकात छप्पर, सरकत्या जिन्याचे काम रखडले, प्रवाशांना उन्हाचे चटके

हेही वाचा – ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळ रेड्याचा अपघातात मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुत्रीचा ओरडण्याचा आवाज ऐकून केदार घराबाहेर आले. तोपर्यंत परिसरातील रहिवासी टेम्पो चालक सचिन याला टेम्पो जागीच थांबविण्याची आणि टेम्पोखाली कुत्री असल्याची सूचना करत होते. रहिवाशांच्या ओरडण्याकडे लक्ष न देता सचिनने टेम्पो पुढे घेतला. टेम्पोचे चाक कुत्रीच्या अंगावरून गेल्याने ती जागीच मरण पावली. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे हवालदार शिवाजी राठोड या प्रकरणाचा तपास करत आहेत.