ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील पदपथ आणि रस्ते फेरिवाल्यांनी गिळंकृत केल्याचे चित्र असतानाच, आता वर्तकनगर परिसरातील रस्त्यावरच थेट शौचालय उभारणीचा घाट पालिका प्रशासनाने घातल्याची बाब पुढे आली आहे. या कामासाठी दोन वर्ष दहा महिन्यांपुर्वी दिलेल्या कार्यादेशाद्वाराची मुदत संपुष्टात आल्यानंतर ठेकेदाराने शौचालय उभारणीचे काम सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या शौचालयामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच त्याशेजारी अनधिकृत टपऱ्या उभ्या राहण्याची भितीही व्यक्त करत त्यास मनसेने विरोध दर्शविला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील पदपथ आणि रस्त्यांवर फेरिवाले ठाण मांडून बसत आहेत. या अतिक्रमणामुळे नागरिाकांना चालण्यासाठी पदपथ उपलब्ध होत नाहीत. त्याचबरोबर रस्ते वाहतूकीसही अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. स्थानक परिसर शहराच्या इतर भागांमध्ये हेच चित्र दिसून येते. या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, आता वर्तकनगर येथील थिराणी शाळेबाहेरील रस्त्यावरच चक्क शौचालय उभारणीचे काम पालिका प्रशासनाने सुरू केले आहे. थेट रस्त्यावरच उभारण्यात येत असलेल्या या कामास आता विरोध होऊ लागला असून याबाबत मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देत शौचालयास विरोध दर्शविला आहे.
काय प्रकरण आहे.वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील हरदास नगर येथे शौचालय उभारणीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने सुरूवातीला तयार केला होता. त्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे पालिकेने हे ठिकाण बदलून वर्तकनगर येथील थिराणी शाळेबाहेरील रस्त्यावर शौचालय उभारणीचा निर्णय घेतला. यासंबंधीचा पालिकेने सविस्तर प्रस्ताव तयार केला. या कामासाठी पालिकेने २३ जून २०२२ रोजी ठेकेदाराला कामाचा कार्यादेश दिला होता.
२६ लाख ४९ हजार रुपयांचा खर्च कामासाठी अपेक्षित धरण्यात आला होता. पावसाळा वगळून १२ महिन्यात हे काम करण्याची मुदत होती. प्रत्यक्षात मात्र या कामाला सुरुवात झाली नव्हती. कामाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर आता ठेकेदाराने प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
वाहतूक कोंडी, टपऱ्यांची भिती वर्तकनगर येथील थिराणी शाळेबाहेरिल रस्त्यावर शौचालयाची उभारणी करण्यात येत आहे. या शौचालयामुळे भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच त्याशेजारी अनधिकृत टपऱ्या, गाळे उभारली जाऊ शकतात. पालिकेला शौचालय उभारायचे असेल तर त्यांनी याठिकाणी असलेले अनधिकृत इमारतीमधील लोकांना इतरत्र स्थलांतरित करून तेथे शौचालयाची उभारणी करावी, अशी मागणी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे मनसेचे विभाग अध्यक्ष संदिप पाचंगे यांनी केली आहे.