ठाणे महापालिकेच्या शाळेतच स्वच्छ भारत अभियानाला हरताळ
स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्यासाठी एकीकडे कडक उपाययोजना आणि कारवाई करण्यात येत असताना ठाणे महापालिकेच्या दिवा येथील शाळेतील शिशू वर्गातील मुलांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याचे वास्तव पुढे येत आहे. या शाळेची दुरवस्था पाहिल्यास पालक आपल्या मुलांना पालिका शाळेत पाठवण्यास का धजावत नाहीत, याचे प्रत्यंतर येते.
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या आगासन येथील शाळा क्रमांक ५३मध्ये बालवाडीचे वर्ग भरतात. या इमारतीच्या छताला पूर्णपणे तडे गेले आहेत. त्यामुळे सध्या पावसाळ्यात वर्गात पाणी शिरून चिखल झाला आहे. इमारतीच्या भिंतींनाही तडे गेल्यामुळे तीही कोसळण्याच्या बेतात आहे. हे सर्व कमी म्हणून की काय या लहान मुलांसाठी शाळेत स्वच्छतागृहच नाही. त्यामुळे बाहेर उघडय़ावर बसण्याशिवाय त्यांच्यापुढे अन्य पर्यायच नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांना कसे शिकवावे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शाळा इमारतीच्या या दुरवस्थेविषयी बालवाडी शिक्षिका कल्पना मरकड यांनी गेल्या वर्षी ३ ऑगस्ट रोजी या संदर्भात प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र वर्षभरात त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
शाळेचा मार्ग बिकट
आगासन येथील महापालिकेच्या ८८ क्रमांकाच्या शाळेत पहिली ते आठवीचे २६० विद्यार्थी शिकत आहेत. मात्र या शाळेत जाण्यासाठी त्यांना धड रस्ताही नाही. येथील कच्च्या पायवाटेवर सध्या पावसामुळे प्रचंड चिखल झाला आहे. या चिखलातूनच विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागते.
आगासन येथील ५३ आणि ८८ या दोन्ही महापालिका शाळांची पाहणी करण्यात येईल. तसेच लवकरात लवकर येथे आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील.
– संदीप माळवी, पालिका अधिकारी