ठाणे – करोना काळात अनेक लहान मुलांनी आपले पालक गमावले. या अनाथ मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी २०२१ साली केंद्र शासनाकडून पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना घोषित करण्यात आली होती. या योजनेच्या निकषानुसार ठाण्यातील एका अमनजीत सिंग (२३) वर्षीय मुलाला त्याच्या शिक्षणासाठी १० लाखांचा निधी देण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ.कृष्णनाथ पांचाळ यांच्या हस्ते या धनादेश त्याला सुपूर्द करण्यात आला. तर विशेष म्हणजे या योजनेची घोषणा झाल्यानंतर लाभ घेणारा अमनजीत हा महाराष्ट्रातील पहिला लाभार्थी तर भारतातील पहिला मुलगा लाभार्थी ठरला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
करोना काळामध्ये देशात मोठ्या संख्येने नागरिकांना करोनाची लागण झाली. या काळात मोठ्या संख्येने रुग्णांचा करोनामुळे मृत्यू देखील ओढवला. यामुळे देशात अनेक मुलं अनाथ झाली होती. ज्या मुलांचे दोन्ही पालक करोनामुळे मृत्यूमुखी पडले होते , अशा मुलांच्या पालन – पोषणाची आणि त्यांच्या भवितव्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला होता. अशा संकटग्रस्त बालकांच्या आधारासाठी भारत सरकारने २९ मे २०२१ रोजी पीएम केअर फॉर चिल्ड्रन ही विशेष योजना सुरू केली.
या योजनेतर्फे १८ वर्षाखालील अनाथ बालकांना शिक्षण, आरोग्य आणि भविष्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची तरतूद करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थी बालकाला २३ वर्षे पूर्ण झाल्यावर त्याच्या नावावर ठेवलेली १० लाख रुपयांची रक्कम एकरकमी दिली जाणार होती, जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. या योजनेचा थेट लाभ घेणारा महाराष्ट्रातील पहिला पहिला लाभार्थी ठरला आहे तो ठाणे जिल्ह्यातील एक युवक. ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्या अमनजितचे आई वडील करोना काळात मृत पावले. यानंतर पनवेल येथे अमनजीतच्या नातेवाईकांनी त्याचा सांभाळ केला. आता नुकतीच त्याच्या वयाची २३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या निकषानुसार त्याला १० लाख रुपयांची मदत रक्कम सुपूर्द करण्यात आली.
अनाथ झालेल्या अमनजीतने आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जीवनातील अडथळ्यांवर मात केली असून आता त्याचा आता लंडन येथील नामांकित विद्यापीठात हॉटेल मॅनेजमेंटमध्ये उच्चशिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेला आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी १० लाख रुपयांची ही रक्कम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर याआधी देखील जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यातून अमनजीतला सीएम केअर फंडातून यापूर्वी पाच लाखांची देखील मदत देण्यात आली आहे.