लोकलमध्ये दरवाज्याजवळ उभ्या असणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारायचा. त्याच्या हातामधील मधील पिशवी किंवा मोबाईल रेल्वेमार्गात पडली की ती उचलून पळून जायचं. अशाप्रकारे चोऱ्या करणाऱ्या एका चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अजय अर्जुन कांबळे (२४, रा. पत्रीपूल, होमबाबा टेकडी, कल्याण पूर्व) असे आरोपीचे नाव आहे.

कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान झोपडपट्टी जवळ लोकल थांबली किंवा तिथे ती संथगीतेने धावू लागली की काही भामटे रेल्वे मार्गालगत उभे राहून हातामधील काठीने हातात मोबाईल किंवा पिशवी असलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीने जोराने फटका मारून ती पिशवी किंवा वस्तू रेल्वेमार्गात पाडत होते. प्रवाशांना काही कळण्याच्या आत रेल्वे मार्गालगत पडलेली पिशवी, मोबाईल घेउन पळून जात होते. वारंवार या घटना कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान घडत असल्याने पोलिसांनी फटका मारण्याच्या ठिकाणी बंदोबस्त लावला होता.

सोमवारी या फटका मारण्याच्या ठिकाणी बदलापूरकडून आलेल्या लोकलमधील एक महिला प्रवासी मनीषा होतचंदानी यांच्या हातावर काठीने चोरट्याने जोरदार फटका मारला. मनीषा यांच्या हातामधील मोबाईल आणि पिशवीत १२ हजार रुपये असलेले पाकिट रेल्वे मार्गात पडले. मनीषा व इतर प्रवाशांनी ओरडा केल्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रेल्वेमार्गात पडलेल्या वस्तू घेऊन पळणाऱ्या आरोपीचा पाठलाग केला. त्याला पकडले. त्याच्या हातात मोबाईल आणि १२ हजार रुपये असलेली बॅग होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जुनने मनीषा यांच्या हातावर फटका मारल्याची कबुली पोलिसांना दिली. मनीषा होतीचंदानी यांच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिस ठाण्यात अर्जुन कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने यापूर्वी असे किती प्रकार केले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.