कल्याण : कल्याण डोंबिवलीत गुरुवारी मध्यरात्री अचानक ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशावरून धरपकड मोहीम राबविण्यात आली. या दोन तासाच्या मोहिमे दरम्यान विविध प्रकारचे २५ गुन्हेगार पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. विविध रस्ते भागात नाकाबंदी करून २६६ वाहनांची तपासणी करून त्यामधील बेशिस्त ६६ वाहन चालकांकडून ७९ हजार रूपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.

कल्याण परिमंडलातील या धरपकड (कोम्बिंग ऑपरेशन) मोहिमेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, ४७ वरिष्ठ पोलीस अधिकारी, २१० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. गुरुवारी रात्री अकरा वाजता या मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. रात्री एक वाजता ही मोहीम संपविण्यात आली.

कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात जाऊन पोलीस पथकांनी अचानक तपासणी करून कारवाया केल्या. तंबाखुजन्य प्रतिबंधित वस्तू विक्री करणाऱ्या २६ टपरी चालकांवर कारवाई करण्यात आली. अवैध धंदे चालविणाऱ्या नऊ जणांवर, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या ८८ जणांवर, सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ विक्री, सेवन करणाऱ्या १४ जणांवर कारवाई करण्यात आली. यामधील २५ जणांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

विविध चाळी, झोपडपट्यांमध्ये छापे मारून तडीपार गुंड, पाहिजे आरोपी, खतरनाक गुंड यांचा शोध घेण्यात आला. कल्याण, डोंबिवली शहराच्या दहा मुख्य प्रवेशव्दारांवर नाकाबंदी करून २६६ वाहने तपासण्यात आली. यामधील अनेक वाहन चालकांनी मद्य प्राशन केल्याचे आढळले. काही जणांकडे वाहनाची कागदपत्रे नव्हती. काही जण सुसाट वेगाने वाहन चालवून जीवितास धोका निर्माण करत होते. अशा एकूण ६६ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७९ हजाराचा दंड वसूल करण्यात आला, असे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले. या धरपकड मोहिमा यापुढे दर पंधरा दिवसांनी राबविण्याचे नियोजन आहे. शहरातील गुन्हेगारी, गैरधंदे संंपविण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.