डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील स्टार काॅलनी भागात विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून त्याची परिसरातील पान टपरी चालकांना विक्री करणाऱ्या साठाधारक आणि इतर सात पान टपरी चालकांविरुध्द पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथक आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन कायद्याने पान टपरी चालकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पान मसाला साठाधारकाच्या गोदामातून दीड लाखाहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखासदृश्य पानमसाला जप्त करण्यात आला आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यातील हवालदार सदाशिव देवरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला साठा धारक आणि विक्रेता मनु शेठ गुजराथी, स्टार काॅलनीतील पान टपरी चालक घिसारा चौधरी (रा. चिंतामणी दर्शन इमारत, गणेशनगर, स्टार काॅलनी, डोंबिवली पूर्व), मानपाडा येथील ललित काट्याजवळील मोनु पानवाला, छोटु पानवाला, बब्लू पानवाला आणि इतर चार पान टपरी चालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नियंत्रणाखालील अंमली पदार्थ विरोधी पथकाला डोंंबिवली पूर्वेत स्टार काॅलनी भागात काही पान टपरी चालक प्रतिबंधित गुटखा, पान मसाला विक्री करत आहेत. त्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती. पथकाचे प्रमुख साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांना या माहितीची खात्री पटल्यावर त्यांनी ही माहिती अन्न व प्रशासन विभागाच्या ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना वानरे यांना दिली. दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे स्टार काॅलनीतील लक्ष्मण स्मृती इमारतीमधील गाळा क्रमांक पाचच्या समोरील भागात छापा टाकला. गाळ्यात शासनाने बंदी घातलेला विमल पान मसाला, राजश्री पान मसाला, सुगंधित पान मसाला, कोल्हापुरी पान मसाला, जाफरानी, राजनिवास पान मसाला असा एकूण एक लाख ५९ हजार रूपयांचा साठा गाळ्यात आढळून आला. हा साठा डोंबिवली परिसरातील पान टपरी चालकांना साठेधारकाकडून चोरून विकला जात होता. पान टपरी चालक ग्राहकांना चोरूनलपून या गुटखा, पानमसल्याची विक्री करत होते, असे पोलीस पथकाला आढळले.
घिसारा चौधरी यांना पोलिसांनी हा साठा कोठुण आणला आणि कोणाला विकला जात होत याची माहिती विचारली. त्यावेळी त्यांनी मुन्ना शेठ गुजराथी यांच्या मदतीने हा गुटखा साठा केला आहे अशी कबुली पोलिसांना दिली. या साठ्यातील पाकिटे मागणीप्रमाणे पान टपरी चालकांना विकली जात होती, असे घिसारा चौधरी यांनी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याचा गाळ्यातील सर्व साठा जप्त केला.
प्रतिबंधित सुपारी, गुटखा, पान मसाल्याची विक्री केली म्हणून अन्न व सुरक्षा मानक कायद्याप्रमाणे एकूण नऊ पान टपरी चालकांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हवालदार राहुल शिंदे, अमित शिंदे, कुशाल नेरक यांच्या पथकाने ही कारवाई केली.