कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत पोलिसांचे २५ गस्ती रक्षक
कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे तसेच रहिवाशांना सुरक्षित जीवन जगण्यास मिळावे यासाठी ठाणे पोलिसांनी कल्याण डोंबिवली शहर परिसरात २५ विशेष गस्ती रक्षकांची नेमणूक केली आहे. दिवस-रात्र हे पथक आळीपाळीने शहरात सेवा देत आहे. गस्ती पथकाचा हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यावर तो विभागवार राबविण्यात येणार आहे.
कल्याण परिमंडळाचे नव्याने नेमणूक झालेले पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांना राष्ट्रपती पुरस्कृत पोलीस महासंचालकांचे विशेष कामगिरीबद्दल पदक जाहीर झाले आहे. याबद्दल महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत पालिकेतर्फे डॉ. शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य गुप्त वार्ता विभागातील संभाजी देशमुख यांचाही पोलीस सन्मान प्राप्त झाल्याने गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. िशदे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. कल्याण, डोंबिवली परिसरातील सोनसाखळी, मंगळसूत्र चोर, भुरटय़ा चोऱ्यांना आळा बसावा. नागरिकांनी रस्त्यावरून ये-जा करताना सुरक्षेची पूर्ण हमी मिळावी म्हणून हे स्वतंत्र गस्ती पथक तयार करण्यात आले आहे. या पोलिसांकडे रेडीओ कॉलर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचे नियंत्रण उपायुक्त कार्यालयातून होत आहे. गस्ती पथकावर असलेला पोलीस नक्की कोठे आणि तो काय करतो यावर लक्ष राहावे म्हणून ही रेडीओ कॉलर पद्धत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे, असे उपायुक्त शिंदे यांनी सांगितले. पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारदाराची तक्रार नोंदली गेली पाहिजे. रहिवाशांना ठरावीक काळात, गतीमान व पारदर्शक कारभाराची हमी पोलीस ठाण्यातून मिळाली पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. या सगळ्या प्रक्रियेसाठी पोलीस प्रशिक्षणाचे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. रहिवासी, लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाला सहकार्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.