उल्हासनगर : शहरातील रस्त्यांवरील खड्डे, पाण्याचे दरवाढ, विकासकामातील अडथळे आणि जनहिताच्या विविध मुद्द्यांवरून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुमार आयलानी आणि महापालिका आयुक्त यांच्यातील संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. बुधवारी आमदार आयलानी यांच्या कार्यालयात महायुतीतील भाजप, शिवसेना, आरपीआय आणि सहयोगी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत महापालिका आयुक्त आणि प्रशासनाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे शहराचा विकास खुंटल्याचा आरोप करण्यात आला. सुरुवातीला नागरिकांना अपेक्षा होती की, नव्या दमाचे आयुक्त आल्याने शहराचा सर्वांगीण विकास होईल, मात्र काही महिन्यांतच त्या अपेक्षांवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त करण्यात आली. येत्या १९ ऑगस्ट रोजी महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीने महा आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

बैठकीत शहरातील खड्ड्यांची समस्या, समाजमंदिरांच्या भाड्यातील वाढ, पाण्याच्या दरांमध्ये वाढ, बांधकामांच्या नियमितीकरणाकडे दुर्लक्ष, नागरिकांना भेटण्यासाठी वेळ न देणे आणि विकासाच्या कामांवर सकारात्मक निर्णय न घेणे या जनहिताच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. शहराकडे सतत दुर्लक्ष करणाऱ्या अशा आयुक्ताची शहराला गरज नाही, अशी ठाम भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.

या सर्व पार्श्वभूमीवर १९ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त आणि प्रशासनाविरुद्ध महाआंदोलन करण्यात येणार असून, उल्हासनगरशी संबंधित तिन्ही आमदार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या बैठकीस आमदार कुमार आयलानी, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, जमनू पुरसवानी, शिवसेनेचे राजेंद्रसिंह भुल्लर, महेश सुखरामणी, आरपीआय जिल्हाध्यक्ष नाना बागुल, प्रकाश मखीजा, प्रशांत पाटील, राजू जग्यासी, शिवसेनेचे कुलवंतसिंग सोहटा, रमेश चौहान, दिलीप गायकवाड, दीपक छतलानी, रामचरली परवानी, किशोर बनवारी तसेच अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

खड्ड्यांवरून संघर्षाला सुरुवात

उल्हासनगर शहरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. शहरात वाढलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दररोज अनेक लहान मोठे अपघात होत असून याच अपघातावर बोट ठेवत स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना सात दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतरही शहरातील खड्डे न भरले गेल्यास पालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलनाचा इशाराही दिला होता. शहरातील खड्ड्यांवरून समाज माध्यमांवर टीका होत असून पालिकेचे धिंडवडे काढले जात आहेत. शहरात टीम ओमी कलानीच्या वतीने समाज माध्यमावर शर्म करो गड्डे भरो ही मोहीमही सुरू केली होती.