बदलापूरः एका कार्यक्रमात बोलताना वारसदारावरून केलेली टिपणी ही स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यावर केल्याचा आरोप करत भाजप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापुरातील शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यावर आगपाखड केली आहे. त्यावरून बदलापूर शहरातील राजकारण ऐन नवरात्रोत्सवात तापले आहे. मात्र मी कुणाच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र राजकारण करण्यासाठी मी जे बोललो नाही त्यारून माझ्या बदनामीचा कट रचला जातो आहे. त्यामुळे सर्वांना कायदेशीर नोटीस पाठवली जाणार आहे, असा खुलासा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केला आहे.

बदलापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपात वाद सुरू असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्यात वाद पाहायला मिळाले. प्रचारातून वामन म्हात्रेंनी ठेवलेले अंतर असो वा पुढे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला पुढाकार असो. या सर्वात शिवेसना विरूद्ध भाजप असा वाद रंगल्याचे दिसून आले. त्यातही आमदार किसन कथोरे आणि वामन म्हात्रे यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत होता.

मात्र या वादाचा पार्श्वभूमीवर १९ सप्टेंबर रोजी आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अचानक विरोधक मानल्या जाणाऱ्या शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांना समाज माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. ही राजकीय खेळी तर नाही ना असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला. मात्र वैयक्तीक संबंध वेगळे आणि राजकीय भूमिका वेगळ्या असे सांगत वामन म्हात्रे यांनी या शुभेच्छांचे समर्थन केले. मात्र दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना वामन म्हात्रे यांनी वारसदार मुद्द्यावर टिपणी केली. त्याची चित्रफीत प्रसारीत झाल्यानंतर भाजप, मनसेतून या वक्तव्यावर टीका करण्यात आली. म्हात्रे यांनी ही टिपणी आमदार किसन कथोरे यांच्यावर केल्याचा आरोप केला गेला. त्यावरून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने थेट मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापले.

मात्र मी कुणाचेही नाव घेतले नाही, ना कुणाला लक्ष्य करत टिपणी केली. त्यामुळे कुणाचा अपमान करण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया वामन म्हात्रे यांनी दिली. माझ्या विरूद्ध बदनामीचा कट रचला जात असून कोणतीही शहानिशा न करता, कोणतेही संदर्भ न पाहता तसेच पूर्ण भाषण न ऐकता टीका केली जाते आहे. समाज माध्यमातून माझी बदनामी केली जाते आहे. त्यामुळे या सर्व टीकाकारांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. भाषणात माझ्यावर वैयक्तीक टिपणी करणाऱ्यांच्या संदर्भाने मी बोलत होतो. मात्र टीका करणाऱ्यांनीच चुकीचे संदर्भ जोडले, असेही म्हात्रे यावेळी बोलताना म्हणाले.