आयुक्तांच्या दौऱ्यादरम्यान समोर आले वास्तव

ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्र आणि प्रसुतीगृहामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांसह इतर डॉक्टर उपस्थित नसणे, या केंद्राची झालेल्या दुरावस्था आणि आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता असे चित्र आयुक्त अभिजीत बांगर यांना मंगळवारी पाहाणी दौऱ्यादरम्यान दिसून आले. याबाबत संबंधितांना जाब विचारत त्यांनी महापालिकेच्या सर्व विभागातील आरोग्यकेंद्रात सेवेत असलेल्या निवासी डॉक्टरांना पूर्णवेळ कार्यरत राहण्याचे निर्देश दिले. सर्वच ठिकाणी रुग्णांना वेळेवर आणि नियमित उपचार मिळतील या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>बोगस डाॅक्टरच्या उपचारामुळे गरोदर महिलेचा मृत्यू

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते, सुशोभिकरण तसेच इतर कामांचा पाहाणी दौरा आयुक्त बांगर यांच्याकडून सातत्याने केला असून अशाचप्रकारे त्यांनी ठाणेकरांना देण्यात येत असलेल्या आरोग्यसुविधेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी दौरा केला. यामध्ये त्यांनी वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर आरोग्य केंद्र आणि मीनाताई ठाकरे प्रसुतीगृहाची पाहणी केली. यापैकी शिवाजीनगर आरोग्य केंद्राची पाहणी त्यांनी दुपारी एक वाजता केली. यावेळी दैनंदिन सेवेत असलेले स्त्रीरोग तज्ज्ञ दुपारी बारा वाजता दुसऱ्या आरोग्य केंद्रात गेल्याची बाब निदर्शनास आली. प्रसुतीगृहामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ पूर्ण वेळ उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे सांगत त्यांनी प्रसुतीगृहामध्ये आणि आरोग्यकेंद्रात डॉक्टरांची उपस्थिती पूर्णवेळ राहील यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. संपूर्ण आरोग्य केंद्रातील सोनोग्राफी कक्ष, शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करीत असताना लॉबीमध्ये वापरात नसलेल्या खाटा आणि इतर साहित्य पडलेले असल्याचे त्यांना दिसून आले. हे सर्व तातडीने हटवून परिसर तात्काळ मोकळा करण्याचे आणि सद्यस्थितीत आरोग्य केंद्रातील पहिल्या मजल्यावर असलेला बाह्य रुग्ण कक्ष तळमजल्यावर करण्याचे आदेश त्यांनी दिले. तळमल्यावर कक्ष केल्यास गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीस्कर होईल, असेही ते म्हणाले. प्रसुतीगृहात नावनोंदणीसाठी येणाऱ्या गरोदर मातांची नोंदणी आठवड्यातून एक दिवस करण्याऐवजी दररोज सुरू राहील या दृष्टीने नियोजन करावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा >>>डोंबिवलीत ३५ हजार पुस्तकांचे अदान प्रदान, सहा हजार नवीन पुस्तकांची विक्री

ठाणे महापालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्र पूर्णवेळ चालू राहतील या दृष्टीने नियोजन करावे आणि या ठिकाणी उपलब्ध असलेली सोनोग्राफी सेंटरची वैद्यकीय सेवा, आवश्यकतेप्रमाणे निवासी डॉक्टर्स, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच वैद्यकीय कर्मचारी यांची तातडीने पूर्तता करावी. नागरिकांचा विश्वास संपादन होईल या दृष्टीने रुग्णांना सेवा देण्याचे काम सातत्याने सुरू राहील याबाबत दक्ष राहून त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. संपूर्ण आरोग्य केंद्रातील आवश्यक स्थापत्य कामे करुन उपलब्ध कक्ष नीटनेटके व स्वच्छ राहतील यासाठी देखील योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालयातील गळती काढणे, प्लास्टर, विद्युतीकरण अशी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना यावेळी दिले. महापालिकेच्या सर्व माता बाल रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया विभाग कार्यान्वित करणे गरजेचे आहे. या सोबतच सर्व ठिकाणी फक्त निवडक प्रसुती नव्हे तर अत्याआवश्यक प्रसुती सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poor condition of health centers of thane municipal corporation thane amy
First published on: 01-02-2023 at 15:52 IST