बदलापूर : सण उत्सव म्हटला की रस्त्यांवर वाढलेली वाहनांची संख्या आणि त्यामुळे होणारी कोंडी ही नित्याचीच आहे. त्यात रस्त्यावर आयोजीत होणाऱ्या कार्यक्रमांमुळे त्या कोंडीत भर पडते. शनिवारी गोपाळकाला निमित्त विविध चौकांमध्ये, महत्वाच्या रस्त्यांवर दहींहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात कोंडी होण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी या चौकांची माहिती करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही वाहतूक कोंडीमध्ये अडकू शकता.

यंदाचा गोपाळकाला हा निवडणुकीच्या पूर्वी आलेला आहे त्यामुळे कार्यकर्ते आणि परिसरातील मंडळांना खुश करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आकर्षक आणि मोठ्या रकमेचे बक्षीस आहे सोबत भेटवस्तू टी-शर्ट आणि इतर साहित्य असे या पारितोषिकांचे स्वरूप आहे गोविंदा पथकांसह नागरिकांना कार्यक्रम स्थळी खेचण्यासाठी नट नट्या नर्तिका कलाकार विरोधी कलावंत आणि संगीत पथकांना पाचारण करण्यात आले आहे अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये अशा अनेक दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे यातील बहुतांश दहीहंडी या शहराच्या मध्यवर्ती भागात वर्दळीच्या चौकात आणि रस्त्यांवर आयोजित करण्यात आले आहेत .त्यामुळे शनिवारी गोपाळकाल्याच्या दिवशी महत्त्वाची चौक रस्ते कोंडीत अडकण्याची भीती आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सर्व भागांमध्ये कोंडी होऊन सर्वसामान्य वाहन चालकांना अडकून पडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

या रस्त्यांवर दहीहंडी

अंबरनाथ शहरातील बी केबिन रस्ता, स्वामी समर्थ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बायपास रस्ता, शिवाजी नगर, हुतात्मा चौक, मटका चौक या शहरातल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर शनिवारी दहीहंडी असेल. त्यामुळे या भागातून जाताना नागरिक, पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्याचवेळी बदलापूर शहरातही बदलापूर बस स्थानक, शिरगाव, आपटेवाडी, रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात, बेलवली श्री कॉम्प्लेक्स, कात्रप तलाव अशा भागात काही लहान मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातही कोंडी होण्याची शक्यता आहे. उल्हासनगर नेताजी चौक येथे मोठी हंडी आयोजित करण्यात आली आहे. इतरही भागात अनेक लहान मोठ्या हंड्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी कोंडीत अडकण्याच्या मानसिकतेची तयारी करणे गरजेचे आहे.