लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील उच्चदाब वीज वाहिनी फीडरच्या देखभाल दुरुस्तीचे काम महावितरणच्या अधिकाऱ्यांना करायचे असल्याने मंगळवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पश्चिमेतील काही भागांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, असे महावितरणच्या डोंबिवली पश्चिम उपविभाग तीनचे साहाय्यक अभियंता संजय यादव यांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा येथील २२ केव्ही उच्चदाब वीज वाहिन्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवारी सकाळी महावितरण अधिकाऱ्यांकडून हाती घेण्यात येणार आहे. या फीडरवरून गरीबाचापाडा परिसरातील भागाला वीज पुरवठा केला जातो. या भागातील वीज पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे, असे अभियंत्यांने सांगितले.
हेही वाचा…. डोंबिवलीतील आयरे गाव हरितपट्ट्यावरील बेकायदा बांधकामांची अधिकाऱ्यांकडून पाठराखण?
दुरुस्तीच्या कामामुळे दोन पाण्याची टाकी परिसर, महाराष्ट्र नगर, श्रीधर म्हात्रे चौक, गरीबाचापाडा, सरोवरनगर या भागाचा वीज पुरवठा सकाळी १० ते दुपारी चार या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळा तोंडावर येत आहे. या कालावधीत काही महत्त्वाची दुरुस्ती कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सहा तासांच्या वीज पुरवठा बंदच्या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.