ठाकुर्लीतील रेल्वे सुरक्षा जवानांच्या तळावर शुक्रवारी जवानांकडून सराव प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अश्रुधूर नळकांड्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. सराव प्रशिक्षण मैदानाजवळ ठाकुर्लीतील इंदिरानगर झोपडपट्टी आहे. अश्रुधूर नळकांड्या फोडण्यात येताच डोळ्यांना झोंबणारा धूर परिसरातील वस्तीमध्ये पसरला. लहान मुलांच्या डोळ्यातून अचानक अश्रू वाहू लागले. वस्तीमधील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. गॅस गळतीची अफवा पसरल्याने लोक घर सोडून वस्तीपासून दूर पळू लागले. इंदिरानगर वस्ती परिसरात खळबळ उडाली.

हेही वाचा- “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत

कंपनीतून गॅस गळती होऊन वायू इंदिरानगर परिसरात पसरला असा गैरसमज करुन लोक वस्तीपासून ओरडा करत पळू लागले. ही माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. वसाहतीमध्ये अचानक धूर कोठून येऊ लागला. या धुरापासून त्रास का होतोय याचा तपास स्थानिक पोलिसांनी सुरू केला. त्यावेळी इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात असलेल्या रेल्वे सुरक्षा जवानांच्या तळावर शारीरिक हालचाली, शस्त्र चालविण्याचा सराव प्रशिक्षण जवानांकडून सुरू असल्याचे पोलिसांना समजले. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन सांडभोर आणि पथकाने जवानांच्या तळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि घडल्या घटनेची माहिती दिली. त्यावेळी स्थानिक पोलीस, सुरक्षा बळाच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन हा सराव प्रशिक्षण (माॅक ड्रिल) कार्यक्रम घेण्यात येत आहे. या सरावातून कोणालाही इजा होणार नाही याचीही दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती प्रशिक्षण प्रमुखाने स्थानिक पोलिसांना दिली.

हेही वाचा- कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीवर उपाय; कल्याण आगारातील बस दुर्गाडी, मुरबाड गणेश घाट येथून सोडण्याचा निर्णय

वस्तुस्थिती समजेपर्यंत इंदिरानगर, शेलार नाका, पाथर्ली भागात गॅस गळतीची अफवा पसरली होती. ही माहिती नंतर डोंबिवली शहर परिसरात पसरली. पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना रेल्वे जवानांकडून सुरु असलेला प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्यामुळे तेथे घेण्यात आलेल्या काही शस्त्रास्त्र चाचण्या, अश्रुधूर नळकांड्यांमुळे धूर इंदिरानगर वसाहतीमध्ये पसरला. त्याचा त्रास रहिवाशांना झाला, अशी वास्तवदर्शी माहिती रहिवाशांना दिली. तेव्हा रहिवाशांमधील अस्वस्थता दूर झाली.

हेही वाचा- ठाणे: शहापूर तालुक्यातील गावांना भूकंपाचे सौम्य धक्के; घराला तडे गेल्यामुळे नागरिकांवर तंबूत राहण्याची वेळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे कार्यक्रम करण्यापूर्वी इंदिरानगर वसाहत परिसरातील नागरिकांना रेल्वे सुरक्षा जवानांनी माहिती द्यावी. अन्यथा अनर्थ ओढावेल अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली. नागरिकांनी आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. गरम पाणी प्यावे म्हणजे ठसका जाणवणार नाही, अशा सूचना पोलिसांनी रहिवाशांना केल्या.