ठाणे – कोणताही सण -उत्सव असो यादिवसात मिठाईला मोठी मागणी असते. त्यातही दिवाळीच्या दिवसात मिठाईची विक्री जोरात सुरु असते. बड्या बड्या मिठाईच्या दुकानात विविध प्रकारच्या मिठाई तयार केल्या जातात. या मिठाई खरेदीला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. परंतू, ठाण्यातील एका बड्या मिठाईच्या दुकानात दिवाळीच्या दिवसात सुवर्ण मिठाई विक्रीसाठी उपलब्ध केली जाते. यंदाच्या दिवाळीत देखील ही सुवर्ण मिठाई उपलब्ध झाली असून ग्राहकांकडून या मिठाई खरेदीला चांगलीच पसंती मिळत आहे. परंतू, ही मिठाई नेमकी कशी तयार केली जाते, त्याची विक्री कशी होते हे जाणून घेऊया.

ठाणे शहरातील प्रशांत काॅर्नर हा मिठाईचा ब्रँड सर्वांना माहितच आहे. प्रशांत कॉर्नरची ख्याती सर्वदूर पसरली आहे. या प्रशांत काॅर्नरमध्येच सुवर्ण मिठाई बनवली जाते. दिवाळीच्या दिवसात या मिठाईच्या दुकानात विविध प्रकारच्या मिठाई उपलब्ध असतात. दिवाळीच्या दहा दिवसांमध्ये काही टन मिठाईची विक्री केली जाते. तर, काजू कतलीची विक्री २ लाख किलो इतकी होते. यंदाच्या दिवाळीत शुगर फ्री मिठाईसह पाच लाख किलो मिठाई विकण्याचे लक्ष्य प्रशांत काॅर्नरने ठेवले आहे. तर, ५०० किलो इतके सुवर्ण मिठाईचे उत्पादन यंदा तयार करण्यात आले असल्याची माहिती प्रशांत काॅर्नर मार्फत देण्यात आली.

सुवर्ण मिठाईची कल्पना कशी सुचली?

प्रशांत काॅर्नरमध्ये मोसमाप्रमाणे बर्फी किंवा मिठाई विक्रीसाठी उपलब्ध केली जाते. हिवाळ्यात याठिकाणी संत्रा बर्फी मिळते. संक्रातीच्या वेळी गजक मिळतात. उन्हाळ्यात आमरस मिळतो. मग दिवाळीला काय खास ठेवता येईल? यातून सुवर्ण मिठाईची कल्पना समोर आली.

अशी तयार केली जाते सुवर्ण मिठाई

पिशोरी पिस्ता, मामरा बदाम, वेलची, केसर यासर्व साहित्याचा वापर करुन ही सुवर्ण मिठाई तयार केली जाते. त्यानंतर त्यावर ९९.९९% शुद्ध सोन्यापासून तयार केलेला वर्ख लावला जातो. अशा प्रकारे ही मिठाई तयार केली जाते.

सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सुवर्ण मिठाईच्या दरात वाढ पूर्वी सुवर्ण मिठाई २२ हजार रुपये प्रति किलोने विक्री केली जात होती. परंतू, यंदा सोन्याचे दर १ लाख पार गेल्याने सुवर्ण मिठाईच्या दरातही वाढ करावी लागली. यंदा ही मिठाई ५० हजार रुपये प्रति किलोने विक्री केली जात आहे. या मिठाईच्या दरात वाढ झाली असली तरी ग्राहकांकडून या मिठाईला उत्तम मागणी असल्याचे प्रशांत काॅर्नर यांच्याकडून सांगण्यात आले.