बदलापूरः गेल्या दोन वर्षात सुरू असलेल्या कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या मालमत्ता कराच्या सॉफ्टवेअरचा प्रश्न यंदा निकाली निघाला आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या एकात्मिक यंत्रणेतून यंदाच्या आर्थिक वर्षात वितरीत करण्यात आलेल्या कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या मालमत्ता कराच्या बिलांमध्ये वाढीव रक्कम आकारण्यात आल्याचा आरोप होतो आहे. शहरातील सुमारे ६० हजार मालमत्ताधारकांना ही बिले वितरीत करण्यात आली असून त्यामुळे बदलापुरकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मालमत्ता कर भरणा असो की मालमत्ता कराच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटी, अशा विविध कारणांमुळे कायमच बदलापूर शहरातील करदात्यांच्या डोक्याला दरवर्षी ताप होत असतो. यंदाही संगणकीय प्रणालीतील चुकांमुळे शहरातील सुमारे ६० हजार मालमत्ता धारकांना वाढीव किमतीची चुकीची बिले पाठवण्यात आल्याचा आरोप होतो आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषद ही राज्यातील एकमेव नगरपरिषद आहे ज्यामध्ये भांडवली मुल्यावर आधारित कररचना अवलंबली जाते. दर पाच वर्षांनी या करप्रणालीनुसार मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन केले जाते. मात्र त्यासाठी आणखी एक वर्षांचा कालावधी आहे. येत्या २०२५-२६ यावर्षात पुनर्मुल्यांकनानुसार मालमत्ता करात वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या संगणकीय त्रुटीमुळे यंदाच्याच वर्षात कुळगाव बदलापूर नगरपरिषदेतील नागरिकांना अतिरिक्त कराची बिले वाटण्यात आल्याचा प्रकार स्थानिक माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी उघडकीस आणला आहे. बिलांमध्ये ७०० रूपयांपासून दीड हजारांपर्यंत वाढ असल्याचे दिसून आल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. सध्या नगरपरिषदेचे अधिकारी चुकीच्या बिलांच्या दुरूस्तीसाठी पालिकेत भेट द्या असे आवाहन करत आहे. मात्र हा अमानवीय प्रकार असून पालिका ६० हजार मालमत्ताधारकांना पालिकेत बोलावणार आहे का, असा संतप्त सवाल संभाजी शिंदे यांनी उपस्थित केला आहे. त्यापेक्षा सुधारित मालमत्ता कराची बिले वाटप करणे अधिक सोपे असून नागरिकांना दिलासा देणारे आहे, त्यामुळे प्रशासनाने त्याबाबत पाऊले उचलावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत भरधाव वाहनाच्या धडकेत विद्यार्थीनीसह तरूण गंभीर जखमी

यंदा पुन्हा उशिर

ऑक्टोबर महिना आला तरी बहुतांश मालमत्ताधारकांना अद्याप मालमत्ता कराची बिले देण्यात आलेली नाहीत. तर जी बिले वितरीत करण्यात आली आहेत त्यात चुकीची वाढ आहे. त्यामुळे या बिलांमध्ये सुधारणा झाल्याशिवाय नागरिकांनी बिले भरू नयेत असे आवाहन करण्यात येते आहे. परिणामी यंदाही करभरणा उशिरा होणार असून ही प्रक्रिया त्रासदायक होण्याची भीती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्रियाः नव्या संगणकीय प्रणालीमुळे काही बिलांमध्ये त्रुटी असून त्याची संख्या नगण्य आहे. ही बिले येताच त्यात दुरूस्ती केली जाते आहे. नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्याचे समाधान केले जाईल. – प्रियंका गांगर्डे, कर विभागप्रमुख, कुळगाव बदलापूर नगर परिषद.