ठाणेकर वाचक संशोधकांसाठी १ हजार १०० ग्रंथांचे विशेष संग्रह दालन, ग्रंथांचे लवकरच प्रदर्शन

ठाणे : ठाण्यातील प्राच्यविद्या अभ्यास संस्थेला प्रसिद्ध अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ, कवी तथा संगीतकार फ्रँकलिन आबोट यांच्यातर्फे १ हजार १०० ग्रंथांची भेट देण्यात आली आहे. यामध्ये मानसशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, कला इतिहास, पर्यटन, संगीत, छायाचित्रण, साहित्य, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांच्या ग्रंथांचा समावेश आहे.

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळ संचालित जोशी-बेडेकर महाविद्यालयात २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भारतीय तत्त्वज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ फ्रँकलिन आबोट सहभागी झाले होते. या शैक्षणिक संस्थेचे कार्य, विविध उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी जाणून घेतल्याने ते अतिशय प्रभावित झाले. तसेच त्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला देखील भेट दिली होती. अमेरिकेत परतल्यानंतरही ते महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक, ग्रंथपाल नारायण बारसे आणि प्रा. डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांच्या संपर्कात होते. त्यांनी संशोधनासाठी उपयोगी ग्रंथसंपदा विद्या प्रसारक मंडळाला देणगी स्वरूपात दाखल करून देण्याची इच्छा व्यक्त केली. करोनामुळे हे ग्रंथ दाखल होण्यास काहीसा विलंब झाला. परंतु, फ्रँकलिन हे संबंधितांशी ई-मेल द्वारे संपर्कात होते. अखेर यावर्षी त्यांनी त्यांच्या संग्रहातील १ हजार १०० ग्रंथ महाविद्यालयात पाठविले.

‘स्पिरीट ऑफ एशिया’, ‘द कम्प्लिट बुक ऑफ स्क्रिप्टरायटिंग’, ‘क्राफ्ट ऑफ कश्मीर, जम्मू अ‍ॅण्ड लदाख’, ‘फोक सग्स ऑफ द वर्ल्ड’,  ‘महाराजा रंजीत सिंग अँज पेट्रोन ऑफ द आ’, ‘मॅजिक बॉल्स’, ‘पोएट्स इन देयर यूथ’, ‘द गार्डन ऑफ लाईफ’, ‘अँन इन्ट्रोडक्शन टू द हिलिंग प्लान्ट्स’, ‘अ डिस्टेंट मिरर’, ‘वास्तु’, ‘द एनसाक्लोपिडिया ऑफ सायन्स अँड सिंम्बॉल्स’, ‘मोशनलेस जर्नी  फ्रॉम अ हेर्मिटेज इन द हिमालयास’, ‘अ हिस्ट्री ऑफ फार ईस्टर्न आर्ट’, ‘आर्ट ऑफ एशिया’, ‘पॅराडाईज ऑन द अर्थ’ इत्यादी अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथांचा यात समावेश आहे.

ही ग्रंथसंपदा ठाण्यात आल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे संचालक डॉ. विजय बेडेकर यांनी या सर्व संग्रहाचे अभ्यासपूर्ण अवलोकन केले. या ग्रंथसंपदेची विषयव्याप्ती आणि संशोधनमूल्य लक्षात घेऊन ही ग्रंथसंपदा विद्यार्थी, इतिहास संशोधक, प्राच्यविद्या संशोधक तसेच विविध विषयांत एम फील आणि विद्यावाचस्पती अभ्यासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. बेडेकर यांनी सांगितले. म्हणूनच, संपूर्ण ठाणेकर वाचक संशोधकांना ही ग्रंथसंपदा खुली करून देण्याच्या उद्देशाने डॉ. बेडेकर यांनी प्राच्यविद्या आभ्यास संस्थेच्या ग्रंथालयात एक विशेष संग्रह दालन करण्याचे ठरविले असून त्यासंदर्भात काम सुरू केले आहे. प्राच्यविद्या अभ्यास संस्थेत ही ग्रंथसंपदा सर्व अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.