ठाणे – राज्यभरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतातील फुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी फुले कुजली आहेत. परिणामी ठाण्यातील फुलबाजारात फुलांची आवक घटली आहे. मात्र गुरुपौर्णिमेचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. गुलाबाच्या दरात १०० ते १५० रूपयांची वाढ तर चाफा ४० रू आणि झेंडूच्या दरात ६० रूपयांनी वाढ झाली आहे.

गुरुपौर्णिमा येत्या गुरुवारी, १० जुलै रोजी साजरी होत आहे. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे पूजन करून फुलांद्वारे आदर व कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच अनेक मंदिरात देव दर्शनासाठी नागरिक जात असतात. त्याचप्रमाणे मंदिरात फुलांनी आकर्षक सजावट केली जाते. नागरिक मंदिरात जाताना फुल, हार घेऊन जात असतात. आदरभावाने देवाचरणी फुले अर्पण केली जातात. गुरूपौर्णिमा हा दिवस शाळेत, महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या आवडत्या शिक्षकांना, प्राध्यापकांना विद्यार्थी फुले विविध भेटवस्तू देत असतात. मात्र ऐन गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील फुलबाजारात फुलांचे दर वाढल्याचे चित्र आहे. यामध्ये चाफा, गुलाब, झेंडू या फुलांचे दर वाढले आहेत.

शहरात फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतू राज्यभरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पावसामुळे शेतातील फुलांचे नुकसान झाले असून फुलांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यात पावसाच्या पाण्याने फुले भिजली जातात. त्यामुळे ती बाजारात दाखल होईपर्यंत कुजत असल्याचे प्रमाण जास्त असते. या कारणाने फुलांची आवक कमी होत आहे. पुणे, जुन्नर, नाशिक, सातारा, कोल्हापुर आणि सोलापूर या जिल्ह्यातून ठाण्यासह उपनगरांमध्ये फुलांची आवक होते. मात्र पावसाचा फटका बसल्याने ठाणे शहरातील फूल बाजारात मागील काही दिवसांपासून फुलांची आवक घटून दर चढे राहिले आहेत.

चाफ्याची १० फुले आधी २० रूपयांना विकली जात होती, आता ५० रूपयांना विक्री होत आहेत. तर ८० ते १०० रूपये किलोने विकल्या जाणाऱ्या गुलाबांची किंमत २०० ते २५० रूपये झाली आहे. एक गुलाबाचे फुल मागील आठवड्यात १० रूपयाने विक्री होत होते. आता एक गुलाबाचे फुल २० रूपयांना विकले जात आहे. तसेच गुलाबांच्या फुलांचा गुच्छ ८० रुपयांना आहे. झेंडू आधी ३० ते ४० रूपये प्रतिकिलो दराने विकला जात होता आता झेंडू १०० रूपये किलोने विकला जात आहे. तर शेवंती आणि मोगऱ्याचा दर १५० रूपये प्रतिकिलो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसामुळे शेतातील फुलांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात शेतातून फुलांचा माल शहरात दाखल होईपर्यंत भिजला जातो. फुले भिजल्याने त्यांचे कुजण्याचे प्रमाण अधिक आहे. या कारणाने बाजारात फुलांची आवक कमी झाली आहे. त्यात गुरूपौर्णिमा असल्याने मागणी वाढली आहे त्यामुळे मागील आठवड्याभरापासून फुलांचे दर वाढले आहेत.-शिवम घोगरे, फुल विक्रेते