डोंबिवली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शहर अध्यक्षपदी राहुल कामत या ज्येष्ठ कार्यकर्त्याची मनसेचे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवड केली. मनसेच्या कार्यक्रमांपासून काही वर्षापासून दूर असलेल्या कामत यांची अचानक शहराध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काही वर्षापूर्वी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिवसेनेतील जो निष्ठावान गट राज ठाकरे यांच्या बरोबर गेला. त्यामध्ये डोंबिवलीतील राहुल कामत यांचाही सहभाग होता. कामत यांचे अनेक सहकारी मनसे सोडून शिवसेनेत गेले. परंतु, कामत यांनी मनसेमध्येच राहणे पसंत केले. मनसेतील सक्रिय कार्यक्रमांमधील त्यांचा सहभाग किरकोळ होता. त्यांची अचानक शहराध्यक्षपदी वर्णी लागल्याने कल्याण, डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित सूचनांचा आदर करून पक्ष नेत्यांच्या आदेशाप्रमाणे विश्वासाने काम करणार आहे, असे कामत यांनी सांगितले.

हेही वाचा >>>रस्त्यांवरील महावितरणच्या रोहित्रांचे अडथळे दूर होणार; कल्याण डोंबिवली पालिकेचा राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प यशस्वी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेच्या शहराध्यक्ष पदाची धुरा मागील पावणे तीन वर्षापासून ज्येष्ठ मनसे कार्यकर्ते मनोज घरत सांभाळत होते. घरत यांच्या पक्षीय कार्याविषयी अनेक तक्रारी मनसे कार्यकर्त्यांनी पक्ष नेत्यांकडे केल्या होत्या. तसेच शिवसेनेत प्रवेश करणारे ॲड. तेलंग, लोके यांच्याशी अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चा केली होती. त्यात त्यांनी शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचल्याचे समजते. तेव्हापासून घरत यांची शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी होण्याची चर्चा मनसे कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली होती. त्यांना पदावरून दूर करून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रचीती दिली आहे. आता कामत शहराध्यक्ष पदाचा गाडा कसा चालवितात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. ‘आपल्या कामातील व्यापामुळे आपणास पदाला न्याय देता येत नव्हता. त्यामुळे या पदासाठी अन्य कोणाचा विचार करावा, अशी सूचना आपण मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्याकडे केली होती. त्याप्रमाणे हा निर्णय झाला आहे,’ असे मनोज घरत यांनी सांगितले.