किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : रेल्वे स्थानक आणि गाडयांमध्ये प्रवाशांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी इंडियन रेल्वे कॅटिरग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) ‘रेल नीर’ या बाटलीबंद पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. परंतु ऐन उन्हाळयात ‘रेल नीर’चे पाणी स्थानक आणि लांब पल्ल्यांच्या अनेक रेल्वेगाडयांमधून गायब झाल्याचे समोर येत आहे. रेल नीरऐवजी रेल्वेने मान्यता दिलेल्या खासगी कंपन्यांचे बाटलीबंद पाणी जास्त दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत.

अंबरनाथ येथील एमआयडीसी भागात ‘रेल नीर’चा कारखाना आहे. या कारखान्यातून दररोज सुमारे दोन लाख बाटलीबंद पाण्याची निर्मिती केली जाते. मात्र  रेल नीरचे उत्पादन सध्या काही तांत्रिक कारणांमुळे कमी झाले असून लवकरच रेल नीर बाटल्यांचा पुरवठा सुरळीत होईल, असा दावा आयआरसीटीसीकडून करण्यात आला आहे. ‘रेल नीर’च्या एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत १५ रुपये आहे. खासगी कंपन्यांकडून बाजारात उपलब्ध केल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याच्या तुलनेत हे पाणी स्वस्त दरात उपलब्ध होते. यामुळे प्रवाशांकडून रेल्वे नीरच्या पाण्याला अधिक मागणी असते, परंतु गेल्या काही दिवसांपासून रेल नीरचे बाटलीबंद पाणी स्थानकातील स्टॉलवर उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. याबाबत स्टॉलमधील कर्मचाऱ्यांना विचारले असता, मागील महिन्याभरापासून रेल नीर उपलब्ध होत नाही. उन्हाळयात प्रवाशांकडून रेल नीरची मागणी अधिक असते, परंतु रेल्वेकडून पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत भाजपच्या कमळ चिन्हाला काळे फासले, दोन जणांना अटक

वंदे भारत एक्स्प्रेस गाडयांमध्ये एक लिटरऐवजी अर्धा लिटर पाण्याची बाटली तिकिटासोबत देण्यात येणार आहे. त्यासाठी रेल नीर प्रकल्प यंत्रणांमध्ये काही बदल करण्याचे काम सुरू आहे. परिणामी, रेल नीरचे सद्य:स्थितीत उत्पादन सुरू असले तरी ते नेहमीपेक्षा कमी आहे. लवकरच रेल नीरचे उत्पादन सुरळीत होईल. खासगी कंपन्यांचे बाटलीबंद पाणी जास्त दराने विकले जात असेल तर प्रवाशांनी तक्रार करावी. त्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

पिनाकिन मोरावाला, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी.

ठाणे रेल्वे स्थानक तसेच लांब पल्ल्याच्या गाडयांमध्ये रेल नीरची मागणी केली असता ते उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्याऐवजी इतर खासगी कंपन्यांच्या बाटलीबंद पाणी दिले जाते. या प्लास्टिकच्या बाटल्यांचा दर्जा रेल नीरच्या तुलनेने चांगला नाही.  – संदेश जिमन, प्रवासी.

चिपळून ते मुंबई प्रवासादरम्यान विक्रेत्याने मला खासगी कंपनीचे २० रुपयांचे बाटलीबंद पाणी दिले. मी रेल नीरची मागणी केली. त्यावेळी त्यांनी रेल नीर उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर मी त्या विक्रेत्याचे मोबाइलमध्ये छायाचित्र काढायला लागलो. त्यानंतर त्या विक्रेत्याने उपलब्ध असलेली रेल नीरच्या पाण्याची बाटली आणून दिली. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– रोहित कुळकर्णी, प्रवासी.