मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय. “राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते ठाण्यातील उत्तरसभेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “मशिदींवरील भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कोठे आहे? तुम्हाला जो नमाज पढायचा आहे, अजान द्यायची आहे ते घरात करा. शहरांचे रस्ते, फूटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय? हे भोंगे खाली उतरवा, आम्हाला त्रास देऊ नका हे सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार.”

“कानाला त्रास होत असेल, तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत”

“वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा धार्मिक विषय नाहीच, हा सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सर्वांना या गोष्टीचा त्रास होतो. तुम्ही दिवसभरात ५-५ वेळा नमाज पढता, बांग देता. एकतर सगळे बेसूर असता. काय म्हणून आम्ही ऐकायचं? रस्त्यावर घाण झाली तर आपण रस्ता साफ करतो. फुटपाथवर घाण झाली तर फुटपाथ साफ करतो, मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा”

राज ठाकरे म्हणाले, “राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. परदेशात अनेक देशांमध्ये बंदी आहे, तिथं निमुटपणे ऐकता ना? माझे अनेक मुस्लीम परिचयाचे लोक आहेत जे येऊन सांगतात की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. असो कोणता धर्म आहे जो दुसऱ्या धर्मियांना त्रास देतो.

“काही सणवार असेल तर समजू शकतो, पण…”

“आज तुमचा रमजान सुरू आहे आम्ही समजू शकतो. आमचाही गणपती उत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो. १० दिवस आम्ही समजू शकतो, तरीही १० दिवस लाऊडस्पिकर कमीच लावला पाहिजे तो भाग वेगळा. काही सणवार असेल तर समजू शकतो, पण तुम्ही जेव्हा ३६५ दिवस लाऊड स्पिकरमधून या गोष्टी ऐकवतात कशासाठी, कोणासाठी?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

“कोणताही तेढ, दंगल आम्हाला निर्माण करायच्या नाहीत”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “३ मार्चला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की कोणताही तेढ, दंगल आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. आम्हाला ती इच्छा नाही, आम्हाला महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडवायचं नाही. आज १२ एप्रिल आहे ते ३ मे या काळात महाराष्ट्रातील सर्व मशिदींमधील मौलवींना बोलावून त्यांना सांगा. सर्व मशिदींवरील लाऊड स्पिकर उतरले गेले पाहिजे. ३ तारखेनंतर तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही.”

“१८ जुलै २००५ चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल”

“१८ जुलै २००५ चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की इतरांची शांतता बिघडवून तुम्ही तुमची प्रार्थना करा किंवा मोठे ध्वनीक्षेप किंवा मोठी वाद्य वाजवून प्रार्थना करा असं कोणताही धर्म सांगत नाही. आमच्यामते समाजात धर्माच्या नावाने म्हातारी माणसं, आजारी रुग्ण, विद्यार्थी यांची पहाटेची झोप बिघडवणं, दिवस खराब करणं आणि बाकीच्यांचा दिनक्रम विस्कळीत करणं अशा गोष्टींना मुळीच परवानगी देता कामा नये,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.

हेही वाचा : ठाण्यात उत्तरसभा का घेतली? प्रत्युत्तर देत राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर संपूर्ण देशात जिथं नमाज लागेल तिथं हनुमान चालिसा लागलाच पाहिजे”

“सर्वोच्च न्यायालयाने ही गोष्ट सांगितली असेल तर राज्यातील गृहखात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय अडचण आहे? हे होत का नाही? ३ मेपर्यंत भोंगे उतरले नाही, तर संपूर्ण देशात जिथं नमाज लागेल तिथं हनुमान चालिसा लागलाच पाहिजे असं मी सर्व हिंदूना सांगतो,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.