ठाणेः Thaane Shilphata Traffic Raju Patil कल्याण-शीळ रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे अक्षरशः हाल होत आहेत. रस्त्यावर तासन्तास अडकून बसण्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले असताना मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. शिळफाटा रस्त्यावर पलावा चौकातील कोंडीचा व्हिडीओ पोस्ट करत राजू पाटील यांनी खरमरीत टीका केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण शीळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडी नवनविन विक्रम प्रस्थापित करत आहेत. या कोंडीवर ठोस उपाययोजना अद्याप केली गेली नाही. त्यामुळे दररोज तासनतास प्रवासी या कोंडीत अडकत आहेत. यावरून माजी मनसे आमदार राजू पाटील सातत्याने सत्ताधारी शिवसेना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. यावरून राजकारण रंगत असले तरी प्रवासी मात्र कोंडीत अडकण्याचे सत्र थांबलेले नाही. आता पुन्हा राजू पाटील यांनी एक चित्रफित पोस्ट करत खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले आहे.

राजू पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ही आहे काल रात्रीची कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडी! या वाहतूक कोंडीला एकमेव कारण म्हणजे या रस्त्यावर असलेल्या ३-४ मोठ्या बिल्डरांचे फ्लॅट्स विकले जावेत म्हणून सुरू असलेले मेट्रोचे काम. २२ किमी लांबीच्या या मेट्रोसाठी केवळ कल्याण-शीळ रस्ता खणून ठेवण्यात आला आहे, तर उरलेल्या १६-१७ किमीचे भूसंपादन अद्यापही झालेले नाही. फक्त काही बिल्डरांच्या फायद्यासाठी स्वतःला इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणवून घेणारे ‘बबड्या भाऊ’ हे काम हट्टाने सुरू ठेवत आहेत.”

पाटील यांनी पुढे सांगितले की, जर या रस्त्यावर तिसऱ्या लेनसाठी बाधित झालेल्या स्थानिकांना योग्य मोबदला दिला गेला असता, तर कमीत कमी रस्ता रुंद करून या कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळू शकला असता. मात्र, एमएमआरडीए (MMRDA) आणि राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) दोन्ही संस्था पूर्णपणे हतबल झाल्या असून, “मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत” असे सांगत हात टेकले आहेत.

त्यांनी प्रशासनावरही संताप व्यक्त करत म्हटले की, “वाहतूक शाखा व पालिका प्रशासनही या प्रकरणात पूर्णपणे गप्प आहे. यावरून त्यांच्यावरही राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होते. पुढील काही दिवसांत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या काळात वाहतुकीची परिस्थिती आणखीनच बिकट होणार आहे. विद्यार्थी शाळेत उशिरा पोहोचत आहेत, चाकरमानी वेळेत कामावर पोहोचू शकत नाहीत, काही वेळा रुग्णवाहिकांनाही अडचणींना सामोरे जावे लागते, पण सत्ताधाऱ्यांना याचं काहीही सोयरसुतक नाही.”

पाटील यांनीचा खासदार शिंदे यांना टोमणा

“या निगरगट्ट सत्ताधाऱ्यांना सध्या फक्त पक्ष फोडून इतरांचे नेते आणण्यातच रस आहे. रस्त्यावर आमच्या माता-भगिनी ४-४ तास अडकल्या तरी या निर्लज्जांना फरक पडत नाही. त्यांना माहीत आहे की निवडणुकीच्या वेळी ‘जय श्रीराम’ ओरडले की जनता पुन्हा मतं देईल, मग त्यांनी कितीही चुका केल्या तरी.”

तसेच त्यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून या मेट्रोच्या कामाला किमान दिवाळीनंतरपर्यंत स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा संतप्त नागरिक “या रस्त्यावर लावलेले पत्रे उखडून फेकून देण्याचा” इशारा देत आहेत, आणि या आंदोलनात आम्हीही सामील होऊ, असा इशाराही पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे.

राजू पाटील यांची पोस्ट

ही आहे काल रात्रीची कल्याण-शीळ रोडवरील वाहतूककोंडी ! या वाहतूककोंडीला एकमेव कारण आहे ते म्हणजे या रस्त्यावर असलेल्या ३/४ मोठ्या बिल्डरांचे फ्लॅट्स विकले जावे म्हणून सुरू असलेले मेट्रोचे काम. खरंतर २२ किमी लांबीच्या या मेट्रो साठी कल्याण-शीळ रस्ता सोडला तर मानपाडा प्रिमियर ते तळोजा पर्यंतचे उरलेले १६/१७ किमी चे भूसंपादन देखील झाले नाही.अशावेळी फक्त या बिल्डरांच्या फायद्यासाठी स्वत:ला इम्फ्रामॅन संबोधवणारा बबड्या भाऊ हे काम हट्टाने सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या चर्चा आहेत. खरंतर या रस्त्यात तिसऱ्या लेनसाठी बाधीत होणाऱ्या भूमीपुत्रांना मोबदला दिला तर किमान तिसरी लेन ताब्यात घेऊन त्यावर कॅांक्रीटीकरण करून रस्ता रुंद केल्यास थोडातरी दिलासा मिळू शकतो, परंतु या लोकांनी MMRDA व MSRDC ला पण भिकेला लावली आहे व त्यामुळे मोबदला देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत.एकंदरीतच वाहतुक शाखा व पालिका प्रशासन सुद्धा यावर ज्याप्रकारे थंड बसून आहेत त्यावरून त्यांच्यावरही दबाव असल्याचे स्पष्ट होत आहे.

आता गणपती व नंतर लगेचच नवरात्री व दिवाळी पण येत आहेत ,त्यामुळे वाहतूक कोंडीत अजूनच भर पडेल.विद्यार्थ्यांच्या शाळा बुडो की चाकरमानी कामावर उशीरा पोहचो,पाऊस पडून तो लोकांच्या घरात जावो की या वाहतूककोंडीत कोणाचे जीव जावोत, आमच्या इथल्या निगरगट्ट सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही.त्यांना सध्या फक्त इतरांचे पक्ष फोडून पक्ष प्रवेश घेण्यात जास्त रस आहे ,मग भले या भयंकर वाहतूक कोंडीत आमच्या माता-भगिनी ४/४ तास अडकून राहिल्या तरी या निर्लज्जांना काहीही फरक पडत नाही.

या निगरगट्ट सत्ताधाऱ्यांचेही एका अर्थाने बरोबरच आहे,कारण निवडणूकीत जय श्रीराम बोलले की त्यांना मतं मिळतात भले त्यांनी कितीही शेण खाल्लेले असावे,हे त्यांना चांगलेच समजले आहे.असो !आमचे बालकमंत्री बबड्या भाऊ पुढे हतबल आहेत, ते काहीच करू शकत नाही. त्यामुळे आता तरी लवकरात लवकर मा. मुख्यमंत्री साहेब व संबंधित खात्यानेच यात लक्ष घालून हे काम किमान दिवाळी संपेपर्यंत बंद ठेवावे अन्यथा यापुढे लोकांना या रस्त्यावर लावलेले पत्रे उखडून फेकून देण्याशिवाय पर्याय उरणार नाही,अर्थात त्या लोकांसोबत आम्हीही असूच याची नोंद घ्यावी.