कल्याण – साताऱ्यात दरे गावी विश्रांतीसाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक पत्रकारांनी मुंबईत राज-उध्दव एकत्र येत आहेत, असा प्रश्न करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नावर चिडून ‘काही तरी कामाचे बोला रे’ असे बोलून एकनाथ शिंदे यांनी राग व्यक्त करून या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिली होती. ‘कामाचे बाला रे’ असा शब्दप्रयोग एकनाथ शिंदे यांनी केल्याने मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी कामाचे बोलताय ना, तर मग ही घ्या विकास कामांची यादी. ही कामे कधी मार्गी लागणार, असा प्रश्न करून ती कामे कधी मार्गी लागतील ते सांगा असे उघड आव्हान दिले आहे.

कल्याण ग्रामीण, कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्यांच्या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांना डिवचण्याची एकही संधी न सोडणाऱ्या माजी आमदार राजू पाटील यांनी गेल्याच आठवड्यात शिंदे यांना डिवचले होते. लोकसभा निवडणुकीपर्यंत पडद्यामागून एकमेकांचे खास मित्र म्हणून वावरणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. शिंदे विधानसभा निवडणूक काळात राजू पाटील यांचे वैरी बनले. मित्रत्वाला जागण्यासाठी कल्याण ग्रामीणमध्ये वजन असलेल्या राजू पाटील यांनी आपली ताकद कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी खर्ची केली. त्या बदल्यात विधानसभा निवडणूक काळात खासदार डाॅ. शिंदे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजू पाटील यांना मदत करायची असा अलिखित करार झाला होता.

मागील काही वर्षापासून शिंदे आणि पाटील घराण्यात वैमस्यच आहे आणि होते. आगरी मतपेटीचा विचार करून पाटील आणि शिंदे यांनी वेळोवेळी मनोमीलनावर भर दिला. कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे शिवसेनेचा उमेदवार नसेल त्यामुळे विजयाची पक्की खात्री बाळगून असलेल्या राजू पाटील यांना आयत्यावेळी शिंदे गटाने दगा देऊन कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे पिता-पुत्रांच्या विश्वासातले राजेश मोरे यांना उमेदवारी दिली. राजू पाटील यांना दणका दिला. राजू पाटील यांनी शिंदे यांची जाहीर सभेत दानत काढली. त्यानंतर पाटील आणि शिंदे गटात जोरदार पाडापाडी युध्द सुरू झाले. राजेश मोरे यांना आमदारकीची लाॅटरी लागली. ही सगळी सल राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर आता काढत आहेत.

प्रश्नावली विकासकांच्या फायद्यासाठी सुरू केलेले कल्याण तळोजा मेट्रोचे भूसंपादन कधी होईल. ते झाले नसेल तर शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोचे काम कधी थांबविणार. पलावा चौकातील बेकायदा दुकान मालकांना मोबदला देऊन ती जागा मोकळी करून चौकातील पुलाचे काम कधी मार्गी लावणार. कल्याण डोंबिवलीकरांचा १४० एमएलडीचा नवी मुंबईने घेतलेला पाणीपुरवठा कधी वळता करणार. अनधिकृत दिवा कचराभूमी कधी बंद करणार. नवी मुंबईतील १४ गावांसाठी ५९०० कोटीचे पॅकेज कधी देणार. शिळ, मानपाडा रस्त्यावरील अतिक्रमणे कधी हटविणार. शिळफाटा रस्ते बाधितांना मोबदला कधी देणार. २७ गावची पाणी योजना कधी पूर्ण होणार. लोकग्राम पादचारी पूल कधी पूर्ण होईल. दिवा रेल्वे पादचारी पूल कधी पूर्ण होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.