ठाणे: ठाणे येथे समलैंगिक, तृतीयपंथीयांच्या हक्क आणि मागण्यांसाठी तसेच जनजागृतीसाठी ठाणे प्राइड फेस्टिवल या उपक्रमांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शनिवार, ३१ मे रोजी सायंकाळी ४. ३० वाजता ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शन ते तलावपाळी या मार्गावर काढण्यात येणार आहे.
ठाणे शहरात पहिल्यांदाच समलैंगिक (LGBTQ ) समूहातील तरुण व्यक्तींनी मिळून ठाणे प्राइड फेस्टिवल हा उपक्रम आयोजित केला आहे. हा उपक्रम जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखिल आयोजित करण्याचे नियोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेद्वारे ‘वसई विरार प्राईड फेस्टिवल’ या उपक्रमाच्या माध्यमातून वसईचा पहिला प्राईड मार्च २०२३ तर, विरारचा पहिला प्राईड मार्च २०२४ साली पार पडला.
ठाण्यात हा उपक्रम स्वीकार द रेनबो पॅरेंटस आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, ३१ मे रोजी ही रॅली असणार आहे. ठाणे येथील नितीन कंपनी जंक्शन ते तलावपाळी असा या रॅलीचा मार्ग असणार आहे.
प्राइड रॅलीत हे मुद्दे असणार
– समलैंगिक (LGBTQ ) समूहाचे अस्तित्व आणि हक्क याबाबत समाजात जनजागृती करणे.
– समलैंगिक व्यक्तींना लग्न करण्याचा अधिकार तसेच दत्तक अधिकार असे समान मानवी अधिकार प्राप्त व्हावे.
– समुहासोबत होणारे अपराध (भेदभाव, छळ, ब्लॅकमेल, मारहाण, आर्थिक फसवणूक, बलात्कार, इत्यादी) बाबत जनजागृती निर्माण करणे. समूहातील व्यक्तींना या अपराधांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहन देणे.
– एचआयवी – एड्स (HIV-AIDS) सारख्या आजारांबाबत जनजागृती निर्माण करणे.
– समाजाने अवघड केलेल्या या नैराश्यग्रस्त आयुष्यातला हा एक दिवस खुलेपणाने बाहेर येऊन स्वतःचे अस्तित्व साजरे करणे.