Navi Mumbai Internation Airport / नवी मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद आता वाढू लागला आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर उद्घाटन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर आता भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत बाळ्या मामा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुणी संभ्रम पसरवित असेल तर त्यांना पुर्ण क्षमतेने रोखले जाईल असा इशाराही ठाकूर यांनी यावेळी दिला.

नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारले जात आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२५ अखेर पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असून त्याद्वारे दरवर्षी सुमारे २० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे तसेच प्रकल्प २०३८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ९० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याचे सरकारचे नियोजन आहे. विमानतळ प्रकल्पाचे महत्व विचारात घेता विमानतळाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील स्थानिक क्षेत्रातील विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे धोरणात्मक नियोजन केले जाणार आहे. या विमानतळाचे उद्घाटन येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

नामांतरचा वाद पेटला

विमानतळाच्या नामकरणाचा वाद देखील पेटला आहे. ठाणे, मुंबई, उपनगर जिल्ह्यातील भूमिपूत्रांनी या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील नाव देण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार बाळ्या मामा यांनी एका रॅलीचे देखील आयोजन केले होते. तसेच विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर उद्घाटन होऊ देणार नाही असा इशाराही दिला.

रामशेठ ठाकूर काय म्हणाले ?

भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी बाळ्यामामांवर पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला. मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्योळी ठाकूर म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती गठीत करण्यात आली आहे.

असे असताना या कृतीसमितीला अंधारात ठेवून रविवारी कोपरखैरेणे येथे खासदार बाळ्यामामा यांनी विमानतळाच्या नामांतरासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत विमानतळाला दि.बा.पाटीलांचे नाव दिल्याशिवाय पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही असे प्रसिद्ध पत्रक बाळ्या मामांच्या नावाने सर्व प्रसारमाध्यमांना पाठविण्यात आले आणि त्या बैठकीस रामशेठ ठाकूर उपस्थित असल्याची खोटी माहिती देण्यात आली.

माझ्या नावाचा जाणीव पुर्वक खोटा उल्लेख करण्यात आला असे रामशेठ ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले. माझ्या नावाचा जाणीवपुर्वक खोटा वापर करून कृती समितीत संभ्रम निर्माण करण्याचा हा डाव आहे असा आरोपही रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत शब्द दिला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांच्याशिवाय दुसऱ्या नावाचा कुठेही विचार नाही. कुणी संभ्रम पसरवित असेल तर त्यांना पुर्ण क्षमतेने रोखले जाईल असा इशाराही रामशेठ ठाकूर यांनी यावेळी दिला.