अंबरनाथ : पावसाळ्यात मिळणाऱ्या औषधी गुण असलेल्या रानभाज्या या खवय्यांसाठी पर्वणीच असते. मात्र त्यासाठी एक जागा नसल्याने त्यांच्या शोधासाठी अनेकदा फिरावे लागते. मात्र आता या रानभाज्यांना जिल्हा परिषदेच्या मॉलमध्ये जागा देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर मॉल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यात आता आदिवासी बांधवांनी जंगलातून गोळा केलेल्या रानभाज्या आणि स्थानिक शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
अंबरनाथ पंचायत समितीच्या तालुका कृषी विभाग व आत्मा संस्थेच्या वतीने अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या तळमजल्यावर मंगळवारी रानभाजी महोत्सव भरवण्यात आला. या महोत्सवात २७ स्टॉल उभारण्यात आले होते. ग्रामीण भागातील आदिवासी महिलांनी उभारलेल्या या स्टॉलवर आघाडा, शेवळा, कुलोजी, भारंग, मायाळू, कपाळफोडी, दिंडा, करटोळी, टाकळा अशा विविध रानभाज्यांची विक्री करण्यात आली. ठाणे व रायगड जिल्ह्यांतील आदिवासी बांधव दरवर्षी पावसाळ्यात रानभाज्या विक्रीसाठी शहरांत येतात.
अंबरनाथ, मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधव आणि विशेषतः महिला या जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या या भाज्या संकलीत करतात. त्यानंतर त्या शहरातील बाजारात विक्रीसाठी घेऊन येत असतात. गेल्या काही वर्षात या भाज्यांचे औषधी गुण आणि त्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर शहरी भागातील नागरिकांमध्येही त्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे या भाज्या आदिवासी बांधवांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरल्या आहेत.
त्याच निमित्ताने विविध रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले जाते आहे. अंबरनाथमध्येही असाच एक रानभाज्या महोत्सव संपन्न झाला. महोत्सवाचे उद्घाटन अंबरनाथ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंडित राठोड यांच्या हस्ते झाले. त्यांनी विविध स्टॉलना भेट देऊन पाहणी केली. या प्रसंगी त्यांंनी या भाज्यांना मॉलमध्ये जागा मिळेल यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर, मंडळ कृषी अधिकारी नामदेव शिंदे, उपकृषी अधिकारी बाळासाहेब माने, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल म्हसदे, तसेच कृषी विभाग व पंचायत समिती अंबरनाथ येथील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे महोत्सव सातत्याने राबवण्याची गरज असून त्याची माहिती, पाककृती, त्याचे वैशिष्ट्ये यासंदर्भात जनजागृती करण्याची गरज व्यक्त होते आहे.