rain update today : ठाणे – मुंबई, ठाणे तसेच उपनगरात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. तर, मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आले आहे. असे असताना मुंबई शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परंतु, ठाणे शहरातील शाळा सुरु आहेत. काही शाळांनी स्वत:हून दुपारच्या सत्रातील मुलांना सुट्टी जाहीर केली परंतु, काही शाळा या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेची वाट पाहत आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील बहुतांश शाळेतील विद्यार्थी रेड अलर्टमध्येही शाळेत पोहोचले आहेत.

मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबई तसेच ठाणे शहरात पाऊस कोसळत आहे. ठाणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवार पावसाने हजेरी लावली असली तरी मुसळधार असा पाऊस कोसळला नव्हता. परंतु, सोमवारी सकाळपासूनच ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नागरिकांची दैना उडाली आहे. तर, नोकरदार वर्गाचे हाल झाले. त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. तर, शहरात अनेक सखल भागात या पावासामुळे पाणी साचले होते.

घोडबंदर (ghodbunder road) भागातील गायमुख परिसरात असलेल्या डोंगरातून पावसाचे पाणी खाली रस्त्यावर येत आहे. या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ते पाणी रस्त्यात साचले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. याचा परिणाम, घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गावर झाला असून वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबईसह ठाणे शहराला रेड अलर्ट जाहीर करण्यात आले आहे. पुढील ४८ तासांसाठी हा रेड अलर्ट आहे. त्यामुळे मुंबई शहरातील सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडण्यात आले. तर, दुपारच्या सत्रातील मुलांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परंतु, ठाणे शहरात सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांची शाळा नेहमीच्या वेळेत सोडण्यात आली. तर, दुपारच्या सत्रातील मुलांना पावसामुळे सुट्टी जाहीर होईल असे पालकांना वाटले होते. परंतु, शाळेकडून कोणताही संदेश प्राप्त झालेला नसल्यामुळे विद्यार्थी रेड अलर्टमध्येही शाळेत पोहोचले आहेत. काही शाळा व्यवस्थापकांनी पावसाचा अंदाज घेऊन दुपारच्या सत्रातील शाळेत पोहोचलेल्या मुलांना पुन्हा घरी सोडण्यात आले. तर, काही शाळांनी पालकांना संपर्कसाधून मुलांना शाळेतून घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, अनेक शाळा या जिल्हाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या सुचनेची वाट पाहत राहिल्या. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना रेड अलर्टमध्येही शाळेत बसावे लागल्याचे दिसत आहे.