रेल्वे स्थानक परिसरात चालणे मुश्कील
शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटता सुटेना असेच काहीसे म्हणण्याची वेळ आता डोंबिवलीकरांवर आली आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर सदैव फेरीवाल्यांच्या विळख्यात असल्याने या ठिकाणाहून नागरिकांना प्रवास करणे गैरसोयीचे होते. दिवसेंदिवस वाढत जाणारे फेरीवाले आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे डोंबिवलीकर नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. सण उत्सवांमध्ये तर या परिसराची अवस्था भयावह असते. पालिका अधिकारी कायमच या प्रश्नांकडे डोळेझाक करीत आले आहेत. हफ्ता वसुलीत रममाण झालेले पालिकेचे अधिकारी आणि निवडणुकीच्या तोंडावर आपली पोळी भाजून घेणारे राजकीय पक्ष या समस्या सुटण्यासाठी काही करणार आहेत का?
महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आली आहे. परिस्थिती काहीशी बदलेल असे वाटलेल्या जनतेला भाजप व सेनेने हातमिळवणी केल्याने पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ म्हणण्याची वेळ आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा पडणारा विळखा तातडीने दूर होणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही व प्रवाशांनाही सुखकर प्रवास करता येईल. परंतु नागरिकांची ही मागणी गेली कित्येक र्वष धूळ खात पडून आहे. या प्रश्नाचे गांभीर्य महापालिका प्रशासनाला नाही. याचा वेळोवेळी प्रत्यय येतो. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केवळ निवडणुकीच्या काळात या भागात पाहणी दौरा करून येथील फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनीही पालकमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करीत दुसऱ्याच दिवशी स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटविले. मात्र त्यानंतर लगेचच या ठिकाणी फेरीवाले बसलेले दिसून आले. नागरिकांच्या डोळ्यात तुम्ही किती दिवस धूळ फेकण्याचे काम करणार आहात, असा प्रश्न राजकारण्यांना या निमित्ताने विचारावासा वाटतो. रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांची गर्दी आणि खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या गर्दीची त्यात पडणारी भर यामुळे स्टेशन परिसरात पाय ठेवणे अवघड झाले आहे.

 

रस्तारुंदीकरण होणे आवश्यक
राहुल गावडे, ठाणे</strong>
तलावपाळी चौक ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपर्यंतच्या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करू, अशी अनेक आश्वासने लोकप्रतिनिधींच्या वतीने देण्यात आली. अर्थसंकल्पात तरतूद असतानाही या रस्त्याचे काम गेले वर्षभर रखडले आहे. त्यामुळे स्थानक परिसरातील रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सॅटीस उभारण्यात आला. मात्र, त्याच्या बांधकामामुळे येथील रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावर मोठी वर्दळ असून त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असते. दुकानदार आणि व्यापारी आपल्या वस्तू विक्रीसाठी पदपथावर ठेवतात. त्यामुळे नागरिकांना चालणे गैरसोयीचे ठरत आहे. पदपथ मोठे आहेत.ते सोडून जी मोकळी जागा आहे, त्याचा उपयोग रस्त्याच्या रुंदीकरणासाठी करण्यात यावा. रस्ता रुंदीकरणाचे काम झाल्यास परिसरातील वाहतूक समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. महापालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. रस्त्याचे रुंदीकरण तातडीने करून सामान्य नागरिकांना प्रशासनाने दिलासा द्यावा. महापालिका आयुक्तांनी याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

 

वाचन संस्कृती कशी रुजेल?
अरविंद बुधकर, कल्याण</strong>
ठाणे जिल्ह्य़ातील दुर्गम भागातील शाळांची परिस्थिती भयावह आहे. शाळेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही नाहीत. या शाळांमध्ये चांगली प्रसाधनगृहे, पाणी, वीज अशा सुविधांचा तुटवडा आहे. चांगले सुशिक्षित शिक्षक दुर्गम भाग म्हणून त्या ठिकाणी शिकविण्यास तयार होत नाहीत. जिल्हा परिषद सदस्य किंवा अधिकारी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. जर हे चित्र असेच सुरू राहिले तर या परिसरातील मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होणार कशी? विज्ञान हा विषय शिकवण्यासाठी शाळांमध्ये प्रयोगशाळाच नाहीत. शाळेत जाण्यासाठी वाहने कमी परंतु खर्च जास्त या समीकरणाचा अवलंब विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे जंगलातील खडकाळ रस्त्यांनी प्रवास करीत त्यांना शाळा गाठावी लागते. शाळेतील आठवी-नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांना धड वाचताही येत नाही आणि बोलण्यात आत्मविश्वास जाणवत नाही. आपला देश महासत्ता बनण्याची स्वप्ने एकीकडे पाहत आहे तर दुसऱ्या बाजूला देशात शहरी शिक्षण आणि ग्रामीण शिक्षण यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे. शिक्षकांचे वाचनही फार मर्यादित असल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळते. काही शिक्षकांना त्यांच्या लहानपणी शैक्षणिक अभ्यासक्रमात कुठली पुस्तके होती, हेही माहीत नाही असे जाणवले. जेथे वाचनलये समृद्ध असतील तेथे विकास लवकर होतो. अशा परिस्थितीत जितकी शासनाची जबाबदारी आहे, तितकीच पुस्तक प्रकाशक/साहित्य परिषद/ग्रंथालये आणि नागरिकांचीही आहे. आपण शाळांमधील ग्रंथालये समृद्ध कशी होतील, विज्ञान विषय शिकवण्यासाठी प्रयोग सामग्री कशी उपलब्ध होतील हे पाहणे आवश्यक आहे.