कल्याण – ठाकुर्लीतील रेल्वे फाटक ते ९० फुटी रस्त्यादरम्यानच्या म्हसोबा चौकापर्यंतच्या उड्डाण पुलाने बाधित होणाऱ्या म्हसोबानगर झोपडपट्टीतील सुमारे ३० कुटुंबियांचे खासगी विकासकाच्या माध्यमातून पुनर्वसन केले जाणार आहे. हे रहिवासी राहत असलेल्या ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील जमिनीचा विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) विकासकाने आपल्या खासगी इमारतींसाठी वापरल्याने फ प्रभागाने या भागातील रहिवाशांचे पुनर्वसन करू नये, असे स्पष्ट निर्देश पालिकेच्या नगररचना विभागाने दिले आहेत.

ठाकुर्ली रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाने डोंबिवली पूर्व, पश्चिम भाग जोडण्यात आला आहे. या पुलाची ४५० मीटर लांबीची आणि १५ मीटर रुंदीची एक मार्गिका ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळील सारस्वत काॅलनी, ठाकुर्ली रेल्वे प्रवेशव्दार ते ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकापर्यंत प्रस्तावित आहे. या मार्गिकेच्या ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकापर्यंतच्या भागात संतवाडी आणि म्हसोबानगर या दोन झोपडपट्ट्या आहेत. पन्नासवर्षांपासून रहिवासी या जागेत राहतात. या दोन्ही झोपडपट्ट्यांमध्ये एकूण ११९ झोपड्या आहेत.

हेही वाचा – मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील म्हसोबानगर मधील २८ झोपड्यांच्या जागेचा विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) एका खासगी विकासकाने एका गृहसंकुलासाठी दहा वर्षांपूर्वी वापरला. ठाकुर्ली उड्डाण पुलाची मार्गिका या दोन्ही झोपडपट्ट्यांवरून म्हसोबा चौकात नेण्याचा विषय पुढे आला, त्यावेळी या झोपड्यांचा विकास हक्क हस्तांतरण एका गृहसंकुलात वापरला असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही माहिती पालिकेने संबंधित विकासकाला दिली. विकासकाने उड्डाण पुलाच्या मार्गिकेचे काम सुरू होईल, तेव्हा म्हसोबानगर झोपडपट्टीतील २८ कुटुंबियांच्या झोपड्या पालिकेला तोडून देण्याची आणि येथील कुटुंबियांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची हमी पालिकेला दिली. संतवाडीमधील ६२ पात्र, म्हसोबानगरमधील २८ पात्र कुटुंबियांचे पुनर्वसन होत नसल्याने पुलाचे काम दोन वर्षापासून रखडले आहे. या पुलाचा ठाकुर्ली पूल ते ठाकुर्ली रेल्वे फाटकापर्यंतचा दोनशे मीटरचा टप्पा बांधून पूर्ण झाला आहे. या झोपडपट्टीतील २९ कुटुंबियांना कागदपत्रांअभावी अपात्र करण्यात आले. एकाच नावाच्या व्यक्तींची २३ घरे या झोपडपट्टीत होती. या व्यक्तीला एकच घरासाठी पात्र करण्यात आले, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

एमएमआरडीएच्या निधीतून या पुलाची उभारणी केली जात आहे. अगोदर आमचे योग्य जागेत पुनर्वसन करा, मगच झोपड्या तोडा, अशी भूमिका पात्र लाभार्थींनी घेतली आहे.

नवीन मार्गिका लाभ

ठाकुर्ली उड्डाण पुलाची ९० फुटी रस्त्याकडे जाणारी रेल्वे मार्ग समांतर मार्गिका सुरू झाली तर डोंबिवली पश्चिम, पूर्व भागातील प्रवाशांना पुलावरून थेट ९० फुटी रस्त्यावर जाणे शक्य होणार आहे. वाहनांचा जोशी शाळेजवळ वळसा किंवा पेंडसेनगरमधून चोळे गावातून ९० फुटी रस्त्यावरून जाण्याचा त्रास वाचणार आहे.

हेही वाचा – कडोंमपा शाळेत नियमित वेळेत न येणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करा,आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकुर्लीतील म्हसोबानगर झोपडपट्टीतील पात्र लाभार्थींचे पुनर्वसन विकासकाकडून करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. संतवाडीतील पात्र लाभार्थींना घरे देण्याचा विचार सुरू आहे. येथील कुटुंबियांचे पुनर्वसन झाले की या भागातील झोपड्या पुलाच्या कामासाठी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांचे मार्गदर्शन घेऊन तोडल्या जातील. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.