ठाणे : मुंब्रा येथील देसाई खाडीमधील राखीव वन क्षेत्रात खारफुटी नष्ट करून रस्ता बांधण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. अखेर शुक्रवारी कांदळवन कक्ष, पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत दीड हेक्टर भागातील अतिक्रमण हटवून बेकायदा रस्ता बंद केला. वाळू माफियांनी वाळूच्या गाडय़ांच्या वाहतूकीसाठी हा रस्ता तयार केला होता. तसेच खाडीतून अवैधरित्या काढलेली वाळू साठविण्यासाठी येथे दोन मोठे हौदही तयार केले होते. हे हौदही तोडण्यात आले. मुंब्रा येथील चुहा पूल ते दिवा या भागात खाडीमध्ये खारफुटींवर भराव टाकून रस्ता तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये ‘टाळेबंदीत खारफुटींची बेसुमार कत्तल’ या मथळय़ाखाली प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत कांदळवन कक्षाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी रस्ता बांधण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच रमेश पाटील यानेही खाडीत भराव टाकून विवाह समारंभासाठी मोठे मंडप उभारल्याचे आढळले होते. त्याच्या चौकशीत गणेश पाटील याचेही नाव पुढे आले. त्यानुसार या दोघांविरोधात कांदळवन कक्षाने गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, इतक्या मोठय़ाप्रमाणात खारफुटी नष्ट करण्यात आल्याने तेथील अतिक्रमण हटविण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर होते. अखेर शुक्रवारी कांदळवन कक्ष, महसूल आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली. येथील दीड हेक्टर परिसरातील अतिक्रमण हटवून तेथील बेकायदा रस्ता बंद करण्यात आला. ही कारवाई करताना वाळू माफियांनी खाडीमधून अवैधरित्या काढलेली वाळू साठविण्यासाठी दोन हौदही बांधल्याचे निदर्शनास आले. ते हौदही तोडण्यात आले. कांदळवन कक्षाने तेथे आता रस्त्याच्या ठिकाणी चर खोदण्यास सुरूवात केली आहे. याठिकाणी खारफुटींच्या सहयोगी वनस्पतींची लागवड करण्याचा विचार सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ठाणे आणि भिवंडी भागातील खारफुटी नष्ट करून अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. - चेतना शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन कक्ष