ठाणे – ठाणे शहरामध्ये ४५ वर्षांपुर्वी उभारण्यात आलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होत असून आता तिथे बसविण्यात आलेली विद्युत यंत्रणेची तसेच ध्वनीक्षेपकाच्या आवाजाची पातळीची तपासणी येत्या दोन दिवसांत करण्यात येणार आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले रंगायतन आता १५ ऑगस्टपर्यंत खुले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह ओळखले जाते. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलावाच्या काठालगतच हे नाट्यगृह आहे. १९८० मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली. या नाट्यगृहात नाटक तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. नाटक पाहण्यासाठी येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. या नाट्यगृहात उदवाहकाची व्यवस्था नव्हती. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जिने चढावे लागत होते. यामुळे त्यांची दमछाक होत होती. तसेच या नाट्यगृहाचे बांधकाम ४५ वर्षे जुने असल्याने ना दुरुस्त झाले होते. या बांधकामाची काही वर्षांपुर्वी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता नाट्यगृहात पुन्हा दुरुस्तीचे काम निघाले होते.
त्यामुळे पालिकेने या नाट्यगृहाची तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी त्याचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नगरविकासव विभागाने निधी दिला होता. या कामामुळे गेल्या आठ महिन्यांपासून हे नाट्यगृह बंद आहे. यामुळे नागरिकांना मानपाडा येथील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जावे लागत आहे.
यंत्रणेची तपासणी
गडकरी रंगायतन नाट्यगृह दुरुस्तीची कामे मे महिन्यात पुर्ण होऊन १५ मे पर्यंत नाट्यगृह खुले होईल, अशी शक्यता पालिकेने वर्तविली होती. मात्र, काही कारणामुळे हे काम पुर्ण होऊ शकलेले नाही. नाट्यगृहात नवीन विद्युत यंत्रणा, व्यासपीठ, पडदा ध्वनीक्षेपक यंत्रणा, वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यात आली आहे. उद्घाटनानंतर नाट्यगृह खुले झाल्यानंतर कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये यासाठी विद्युत यंत्रणा आणि ध्वनीक्षेपकाच्या आवाजाच्या पातळीची तपासणी पालिकेकडून केली जाणार आहे. याशिवाय, पुर्वी व्यासपीठाजवळच वातानुकूलीत यंत्रणेचे ब्लोअर होते. आता चारही बाजूंना हे ब्लोअर बसविण्यात आलेले आहेत. त्याचीही तपासणी केली जाणार आहे.
नवीन व्यवस्था
नाट्यगृहात १ हजार १७ व्यक्ती बसू शकतील, इतकी आसन क्षमता होती. जुन्या खुर्च्या आकाराने छोट्या आणि एैसपैस नव्हत्या. यामुळे जुन्या खुर्च्या काढून त्याठिकाणी नवीन एैसपैस खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. यामुळे आसन क्षमता ५० ते ६० खुर्च्यांनी कमी झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना जिने चढावे लागू नये यासाठी नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूस उदवाहक बसविण्यात आली आहे. त्याची नुकतीच तपासणी करण्यात आली. नाट्यगृहामध्ये ४७ वर्षांपुर्वी व्यासपीठावर बसविण्यात आलेला पडदा जुना जीर्ण झाल्यामुळे तो बदलण्यात आला आहे. पालिकेने अग्निरोधक पडदा बसविला आहे.
कधीपर्यंत खुले होणार
नाट्यगृहातील दुरुस्तीचे काम जवळपास पुर्ण झालेले आहे. आता त्याठिकाणी करण्यात आलेल्या नुतनीकरणाच्या कामाची पाहाणी करण्यात येत आहे. या पाहाणीनंतर नाट्यगृह लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यामुळे १५ ऑगस्टपर्यंत नाट्यगृह खुले होईल, अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.