कल्याण : निवृत्त मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया आयोगाच्या अहवालाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेत नागरिकांचा मागास प्रवर्गाची आरक्षण टक्केवारी २७ टक्के ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यामुळे तीन सदस्य प्रभाग रचनेप्रमाणे १२२ प्रभागांप्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३५ जागांसाठी येत्या शुक्रवारी सोडत काढली जाणार आहे.
या आरक्षण सोडतीमुळे नागरिकांचा मागास प्रवर्गातील इच्छुकांना नव्याने जोमाने पालिका निवडणुकीत उतरण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण सर्वाेच्च न्यायालयात अडकल्याने या जागा आपणास मिळणार नाहीत या विचाराने या वर्गातील उमेदवार, इच्छुकांमध्ये अस्वस्थता होती. तो मार्ग आता मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका झाल्या असत्या तर त्याचा फटका सर्वच पक्षांना बसला असता. त्यामुळे ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका घेऊ नका अशी मागणी राजकीय पक्षांकडून केली जात होती.
आगामी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्य प्रभाग पध्दतीत १५ लाख ३८ हजार लोकसंख्येप्रमाणे १३३ प्रभागांमधून एकूण ४४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे अनुसूचित जाती, जमाती, महिला आरक्षित, सर्वसाधारण वर्गासाठी पालिकेने आरक्षण जाहीर केले. हे आरक्षण कायम ठेऊन ११६ जागांसाठी फेर आरक्षणाची सोडत येत्या शुक्रवारी काढली जाणार आहे. आता पर्यंतच्या प्रभाग रचनेत सोडतीत दोन महिला, एक महिला, दोन्ही सामान्यांसाठी खुली अशी आरक्षणे पडली आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग रचनेमुळे काही प्रभागांमध्ये ओबीसी उमेदवाराला संधी मिळणार आहे. पालिकेत एकूण नगरसेवक १३३. प्रभाग संख्या ४४, अनुसूचित जाती १३, अनुसूचित जमाती चार, ओबीसी ३५, सर्वसाधारण महिला ४१, सर्वसाधारण खुला गट ४० अशी प्रभागवार रचना आहे.