बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये आता महिलाराज येणार, हे निश्चित झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर केली असून अंबरनाथ नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी, तर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठरले आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांचा कारभार महिलांच्या हाती येणार असून गेल्या काही महिन्यांपासून नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या अनेक राजकीय दिग्गजांचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान, काही प्रमुख पुरुष नेते आता आपल्या पत्नींना उमेदवारी देण्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच प्रभागरचना अंतिम करण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयात सोमवारी राज्यातील सर्व नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत अंबरनाथ नगराध्यक्षपद महिलांसाठी, तर बदलापूर नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले.
सन २०१५ नंतर या दोन्ही नगरपालिकांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत. गेल्या पाच वर्षांपासून येथे प्रशासकीय राजवट आहे. मात्र यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने या निवडणुकीकडे ‘मिनी विधानसभा’ म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची जोरदार चढाओढ होती. शिवसेनेचे, भाजपाचे आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांच्या आकांक्षांवर पाणी फिरले आहे.
अंबरनाथमध्ये काँग्रेसचे प्रदीप पाटील, शिवसेनेचे राजेंद्र वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि भाजपाचे अभिजित करंजुले पाटील यांच्या नावांची चर्चा होती. तर बदलापुरात शिवसेनेचे वामन म्हात्रे, प्रवीण राऊत आणि भाजपाचे राजेंद्र घोरपडे आदींची नावे पुढे येत होती. आता या नेत्यांपैकी काही जण आपल्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘महिलाराज’ तर दिसणारच आहे, पण त्यामागे पुरुष नेत्यांचे राजकीय गणित किती प्रभावी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सन २०१५ ची सदस्यसंख्या अंबरनाथमध्ये ५७ व बदलापूरमध्ये ४७ सदस्य होते. यंदा पॅनल पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत अनुक्रमे ५९ आणि ४९ सदस्य असतील.
अंबरनाथमध्ये महिलांचे वर्चस्व कायम
२०१५ मध्ये शिवसेनेच्या प्रज्ञा बनसोडे आणि मनिषा वाळेकर यांनी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात नगराध्यक्षपद भूषवले होते. आता पुन्हा महिलांसाठी पद आरक्षित झाल्याने अंबरनाथमध्ये महिलाराज कायम राहणार आहे.
बदलापुरातील मागील नगराध्यक्ष २०१५ मध्ये शिवसेनेच्या विजया राऊत नगराध्यक्ष होत्या, त्यानंतर प्रियेश जाधव यांना पदाची संधी मिळाली होती.