डोंबिवली – डोंबिवली पूर्वेत आयरे गावातील बेकायदा राघो हाईट्स ही इमारत तोडण्यास बुधवारी पालिकेच्या ग प्रभागाचे तोडकाम पथक बुधवारी दुपारी गेले होते. रामनगर पोलीस ठाण्याचे २० पोलीस यावेळी बंदोबस्तासाठी होते. जेसीबी आणि तोडकाम पथक घेऊन साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत बेकायदा राघो हाईट्स इमारतीजवळ पोहचताच, अगोदरच सज्ज असलेल्या रहिवाशांनी पालिकेच्या तोडकाम पथकाला अडविले आणि कारवाईस विरोध केला.
अगोदर आमचे पुनर्वसन करा, मगच तुम्हाला काय करायचे ते करा, अशी आक्रमक भूमिका रहिवाशांनी घेतली. विरोध करण्यास महिला वर्ग आघाडीवर होता. साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी रहिवाशांना कारवाई करण्यासाठी बाजुला होण्यास सांगितले. रहिवासी काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे यांनी राघो हाईट्स इमारतीत गोरगरीब रहिवासी राहतात. या रहिवाशांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत बेघर होऊ देणार नाही. ही इमारत सुरू होती त्यावेळी ही इमारत पालिका अधिकाऱ्यांना, तक्रारदारांना दिसली नाही का, असे प्रश्न राणे यांनी केले.
राघो हाईट्स या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी म्हणून तक्रारदार उज्जवला पाटील या मागील दोन वर्षापासून पालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. या पाठपुराव्यावरून पालिकेचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे (निलंबित) यांनी २०२१ मध्ये राघो हाईट्स इमारत अनधिकृत घोषित केली आहे. या बेकायदा इमारतीची बनावट कागदपत्रे तयार केली म्हणून या इमारतीची उभारणी करणाऱ्या भीम राघो पाटील, सुरेखा नाना पाटील, मोरया इन्फ्राचे नितीन बाळानंद नाईक यांच्या विरुध्द न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल आहे. तुकाराम राघो पाटील यांची ही मिळकत आहे.
या बेकायदा इमारतीत ३० सदनिका आणि नऊ व्यापारी गाळे आहेत. या इमारतीमधील काही सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत. या इमारतीत रहिवास आहे हे दाखविण्यासाठी काही परिचित लोक या इमारतीत तात्पुरत्या स्वरुपात घुसविण्यात आले आहेत, असे तक्रारदार उज्जवला पाटील यांनी सांगितले.
या बेकायदा इमारतीवर यापूर्वी दोन वेळा पालिकेच्या ग प्रभागाने कारवाई प्रस्तावित केली होती. दोन्ही वेळा कारवाई टळली.
बुधवारच्या कारवाईसाठी पोलीस बळ मिळण्यासाठी आपण स्वता पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्या भेटी घेतल्या, असे तक्रारदार पाटील यांनी सांगितले. राघो हाईट्सच्या प्रवेशव्दारावर रहिवाशांनी ठिय्या मांडून कारवाईवाला विरोध केला. संध्याकाळपर्यंत हा विरोध कायम राहिल्याने पालिका तोडकाम पथक रिकाम्या हाताने माघारी परतले. विरोध करणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. राघो हाईट्स या बेकायदा इमारतीचे मूळ क्षेत्र २१० चौरस मीटर असताना ते बनावट कागदपत्रांच्या आधारे ४०० चौरस मीटर करण्यात आले आहे. या इमारतीसाठी ग्रामपंचायतीची काही जमीन हडप करण्यात आली आहे. पालिकेच्या एका वरिष्ठाने पुढील आठवड्यात या इमारतीवर कारवाईचे आश्वासन तक्रारदाराला दिले आहे.