बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात विजेच्या लपंडावामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. रात्री, मध्यरात्री, पहाटे आणि अनेकदा दिवसभर वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण आहेत. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी, नोकरदार यांच्या वेळापत्रकावर तर होतोच आहे. त्याचसोबत पाणी पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजपुरवठा खंडीत होत असल्याचा दावा महावितरणकडून केला जातो आहे. मात्र पावसाळा पूर्वतयारीसाठी वेळ घेतला असतानाही अशी स्थिती का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
यंदाच्या वर्षात पूर्व मोसमी पावसाने मे महिना गाजवला. त्यामुळे पालिका आणि महावितरणसारख्या शासकीय यंत्रणांचे पावसाळा पूर्व तयारीचे गणित कोलमडले. त्यामुळे मे महिन्यात झाडांची छाटणी, इतर देखभाल दुरूस्तीची कामे होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे जून महिन्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर महावितरणाने देखभाल दुरूस्तीची कामे केली. मात्र त्यानंतरही विजेचा लपंडाव संपत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विविध भागात वेगवेगळ्या वेळी वीज पुरवठा खंडीत होतो आहे. त्यामुळे नागरिकांचे वेळापत्रक कोलमडले आहे. बदलापूर पूर्व भागासह पश्चिम भागातही विजेचा लपंडाव सुरू आहे. पहाटे, दिवसभर, रात्री आणि अनेकदा मध्यरात्रीही वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. शालेय विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसतो आहे. पाणी पुरवठ्यावरही या विजेच्या लपंडावाचा परिणाम होतो आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नोकरदार वर्गाला दिवसा खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याचा फटका बसतो आहे.
कुठे रोहित्र बिघाड, तर कुठे वाहिनी तुटली
अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरणाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संपर्क केला असता त्यांनी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले आहे. बदलापुरात नव्या विकास रस्त्याशेजारील भागात उच्चदाब वाहिनी तुटल्याने सकाळी वीज पुरवठा खंडीत झाला. बदलापुरच्या ग्रामीण भागात रोहित्र दुरूस्तीमुळे रात्रभर वीज पुरवठा खंडीत होता. तर पश्चिमेतही अशीच स्थिती होती. बहुतांश ठिकाणी झाडाच्या फांद्या वाहिन्यांच्या संपर्कात येत असल्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी दोन मीटरपेक्षा अधिक अंतरावरील फांद्या छाटल्या आहेत. त्यानंतरही वाहिन्यांशी संपर्कात येत असल्याने अडचण असल्याची माहिती अंबरनाथच्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.