कल्याण – कल्याण तालुक्यातील नवी मुंबई हद्दीतील १४ गावांमधील पाणी टंचाईचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावा. तसेच, गावांच्या पाणी योजना हस्तांतरण हे विषय विनाविलंब कल्याण पंचायत समिती अधिकाऱ्यांनी मार्गी लावावेत, असे आदेश देताना कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पाणी देयकांच्या थकित रकमेवरील वादाचा विषय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बरोबरच्या बैठकीत मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन १४ गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
कल्याण तालुक्यातील १४ गावांमध्ये कडक उन्हाळामुळे तीव्र पाणी टंचाई सुरू झाली आहे. गावचे विहिरी, कुपनलिकांचे स्त्रोत आटले आहेत. नद्या, डोह कोरडे पडले आहेत. गावांना पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी आमदार मोरे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आमदार मोरे यांनी १४ गाव ग्राम समितीचे पदाधिकारी यांच्या समवेत मंगळवारी कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय भोये, उप अभियंता प्रणिता कापरकर, ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक पंचायत समिती सभागृहात घेतली.
१४ गावांमधील पाणी टंचाईचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात. अस्तित्वातील जलस्त्रोत सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करता येईल का याचा विचार करावा. अनेक गावांच्या पाणी योजना अद्याप ग्राम समितीच्या ताब्यात आहेत. या पाणी योजना लवकर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात याव्यात. यापुढे गावातील पाणी देयकाची वसुली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू केली जाईल.
काही गावांच्या ग्रामपंचायतींकडे पाणी देयकाची मोठी थकबाकी आहे. या थकबाकीवर व्याजाचा बोजा चढत चाललेला आहे. एवढी रक्कम भरणा करणे ग्रामपंचायतींना शक्य नसल्याने याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत एक बैठक घेऊन पाणी देयकावरील व्याजाचा विषय सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आमदार राजेश मोरे यांनी ग्रामस्थांना दिले.
१४ गावांमध्ये सुरू असलेली विकास कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या गावांमधील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी पुरवठा योजना राबविण्याचे नियोजन आहे, असे आमदारांनी सांगितले. गट विकास अधिकारी भोये यांनी १४ गावांमधील पाणी प्रश्नासह इतर प्रश्न मार्गी लावण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे बैठकीत सांगितले. या बैठकीला १४ गाव समितीचे अध्यक्ष भरत भोईर, सचिव लक्ष्मण पाटील, सदस्य भंडार्लीचे माजी सरपंच धनाजी पाटील, डोंंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण, बाजार समिती सभापती भरत भोईर, उपतालुकाप्रमुख गणेश जेपाल उपस्थित होते.