ठाणे : करोनाच्या प्रादुर्भावामुळे ठाणे महापालिकेने गृहनिर्माण संस्थांसाठी नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीमुळे एखादा करोना रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण मजला प्रतिबंधित करणे, करोना रुग्णामुळे इमारतीतील इतर रहिवाशांनी करोना चाचणी करणे अशा कठोर नियमांचा समावेश होता.
गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या नियमावलीस विरोध केला होता. अखेर शनिवारी ठाणे महापालिने ही नियमावली रद्द करून नव्याने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार आता एखादा रुग्ण आढळल्यास ते नियम सदनिकेतील कुटुंबीयांना आणि त्याच्या संपर्कात आलेल्यांना लागू असणार आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात करोना रुग्णवाढ होऊ लागल्यामुळे ठाणे महापालिकेने गृहनिर्माण संस्थांसाठी नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीनुसार एखादा रुग्ण इमारतीमध्ये आढळल्यास त्या इमारतीचा संपूर्ण मजला प्रतिबंधित केला जाणार होता.
एखाद्या रुग्णासाठी संपूर्ण मजला प्रतिबंधित करणे तसेच इतर रहिवाशांची करोना चाचणी करणे हा निर्णय योग्य नसल्याचे म्हणणे होते. एका रुग्णासाठी संपूर्ण मजला प्रतिबंधित केल्यास त्या मजल्यावरील रहिवाशांना घराबाहेर पडणे कठीण होणार होते. अखेर ठाणे महापालिकेने शनिवारी उशिरा ही नियामावली रद्द केल्याचे जाहीर केले. एखादा रुग्ण इमारतीत आढळून आल्यास केवळ ती सदनिका आठवडय़ाभरासाठी प्रतिबंधित करण्याचे नव्या नियमावलीत म्हटले आहे. केवळ प्रतिबंधित सदनिकेतील रहिवाशांना घराबाहेर ये-जा करण्यास बंदी असेल. तसेच संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना करोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. इमारतीत वास्तव्यास असलेले इतर रहिवासी तसेच कामानिमित्ताने येणाऱ्यांना करोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची तपासणी गृहनिर्माण संस्थेसाठी बंधनकारक राहणार आहे. असे नव्या नियमावलीत म्हटले आहे.
ठाणे जिल्ह्यात ९०६१ नवे रुग्ण
ठाणे: ठाणे जिल्ह्यात रविवारी ९ हजार ६१ नवे करोना रुग्ण आढळून आले. तर, तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील उपचारधीन रुग्णांची संख्या ३३१२६ इतकी झाली आहे.