रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाईचा बडगा

ठाणे : लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांतून ठाणे रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांना हेरून करोना चाचणी होऊ न देता त्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात अखेर रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने विशेष मोहीम आखत तीन दिवसांत सात रिक्षाचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह््याची नोंद केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात घुसखोरी करणारे हे रिक्षाचालक आता गायब झाले आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला लाखो प्रवासी ये-जा करत असतात. उपनगरीय रेल्वे गाड्यांप्रमाणे या रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्याही थांबत असतात. मात्र, देशात करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने परराज्यांतून लांब पल्ल्याच्या गाडीने येणाऱ्या प्रवाशांना करोनाची चाचणी बंधनकारक आहे. त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटीस पुलावर ठाणे महापालिकेने प्रवाशांची मोफत करोना चाचणी करण्यासाठी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. मात्र, ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या बाहेर बेकायदेशीररीत्या रिक्षा उभी करून काही रिक्षाचालक रेल्वे स्थानकात घुसखोरी करत होते. तसेच लांब पल्ल्यातील रेल्वे गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांना करोना चाचणीविना रिक्षामध्ये बसवत होते. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या या प्रवाशांमुळे करोनाचा धोका वाढू लागला होता. या संदर्भाचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल ठाणे रेल्वे सुरक्षा दलाने घेतली. त्यानुसार गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा दलाची विविध पथके सर्व रेल्वे स्थानकात गस्ती घालत असून एखादा रिक्षाचालक फलाटाच्या परिसरात दिसल्यास त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करू लागले आहेत. तीन दिवसांत रेल्वे सुरक्षा दलाने सात रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली आहे. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या रिक्षाचालकांना दंड ठोठावला आहे.

प्रकरण काय आहे?

जादा भाडे मिळावे यासाठी काही रिक्षाचालक फलाट क्रमांक एकच्या बाहेर उभे राहत होते. त्यानंतर लांब पल्ल्याची गाडी येत असल्याची उद्घोषणा रेल्वे स्थानकात झाल्यानंतर हे रिक्षाचालक थेट स्थानकात शिरत आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशांना हेरून त्यांना करोना चाचणी करू नका, असे सांगत. करोना चाचणी केल्यास चाचणीमध्ये करोनाबाधित दर्शविले जाईल आणि तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्यात येईल, अशी भीती घालण्यात येत होती. त्यानंतर हे रिक्षाचालक त्या प्रवाशांना त्यांच्या रिक्षात बसवत. त्यांच्याकडून मुंबई आणि ठाणे शहरात जाण्यासाठी ५०० ते १५०० रुपये उकळत होते.