ठाणे – मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या जानेवारी महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडेदर वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर ठाणे परिवहन क्षेत्रातील सर्व रिक्षाचालकांना मीटरमध्ये बदल करण्याची प्रक्रिया ( रिकॅलिब्रेशन ) करणे गरजेचे होते. मात्र वारंवार सूचना देऊन देखील ठाणे परिवहन क्षेत्रातील अवघ्या निम्म्याच रिक्षाचालकांनी मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामुळे ठाणे उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३० जून पर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने भाडेवाढ करण्यात आली असता रिक्षाचालकांनी मीटर रिकॅलिब्रेशन प्रक्रियेत मोठी दिरंगाई केली होती. यामुळे भाडेवाढ परिवहन विभागाच्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
ठाणे शहरात सध्याच्या घडीला ८६ हजार रिक्षा असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे. त्यातील फक्त ४७ हजार ६९० रिक्षांमधील मीटरचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे. मीटरमध्ये बदल झाला नसला तरी अनेक रिक्षाचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शिक्का असलेला कागद दाखवून सुधारित भाडे वसुली सुरू केली आहे, मात्र यावर अनेक प्रवासी आक्षेप घेताना दिसत आहे. मीटरमध्ये दर्शवणारे भाडेच देणार, अशी भूमिका प्रवासी घेताना दिसतात, तर रिक्षाचालक त्यांच्यापुढे परिवहन कार्यालयाचे पत्रक दाखवतात, यावरून वारंवार वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
परिवहन विभागाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात रिक्षाच्या भाडेदरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. यामुळे रिक्षाचे भाडे २३ वरून २६ इतके झाले आहे. यामुळे आधीच भाडेवाढीने ग्रासलेल्या प्रवाशांकडून मीटरमध्ये सुधारित भाडेवाढ दिसली नसल्यास ती देण्यास टाळाटाळ करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर सर्व रिक्षाचालकांनी मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात यावी यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून सर्व रिक्षाचालकांना सूचित केले जात आहे. मात्र सर्व रिक्षाचालक याकडे दुर्लक्ष करत असल्याने विभागाला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने या प्रक्रियेसाठी मुदत वाढ देण्यात येत आहे. त्यामुळे भाडेवाढ परिवहन विभागाच्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
मुदतवाढ समाप्ती नंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी विभागीय दंडात्मक शुल्क प्रतिदिन रुपये ५० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सर्व मीटर टॅक्सी व ऑटोरिक्षा चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी केले आहे.