ठाणे – वागळे इस्टेटमधील कामगार नाका परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीत लोकमान्य नगर, इंदिरा नगर, यशोधन नगरकडे जाणाऱ्या शेअर रिक्षा अडकून राहतात. शेअर रिक्षा प्रति प्रवासी भाडे दरानुसार विचार केला तर, २० रुपये भाडेदर परवडणारे नव्हते. त्यामुळे या मार्गावरील अनेक रिक्षाचालक सायंकाळच्या वेळी रिक्षा बंद ठेवत. परिणामी, स्थानकातून लोकमान्य नगरकडे येणाऱ्या नागरिकांना रिक्षा मिळण्यास विलंब होतो.
या कोंडीचे कारण पुढे करत गेल्या दोन दिवसांपासून शेअर रिक्षा दर प्रति प्रवासी २० रुपये ऐवजी २५ रुपये आकारले जात आहे. मात्र, तरीही सायंकाळच्या वेळी प्रवाशांना रिक्षा पकडण्यासाठी अर्धा ते एक तास रांगेत थांबावे लागत आहे. यामुळे प्रवाशामधून संताप व्यक्त होत आहे.
ठाणे स्थानकातील गावदेवी परिसरात लोकमान्यनगर, इंदिरा नगर, नितीन कंपनी, ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर या भागात जाणाऱ्या शेअर रिक्षांचे थांबे आहेत. या परिसरातील इतर थांबे सोडल्यास लोकमान्य नगर येथील थांब्यावर गेल्या काही दिवसांपासून अर्धा ते पाऊण तासांच्या अवधीने प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत आहेत. तोपर्यंत प्रवाशांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. अनेकदा रिक्षा मिळण्यास एक तास देखील उलटून जात असल्याचे काही प्रवाशांकडून सांगण्यात आले.
गावदेवी येथून लोकमान्य नगरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या शेअर रिक्षा महापालिका मुख्यालय, नितीन कंपनी, ज्ञानेश्वरनगर, कामगार नाका मार्गे वाहतूक करतात. परंतू, गेल्या काही दिवसांपासून कामगार रुग्णालय ते कामगार नाका आणि सावरकन नगर ते कामगार रुग्णालय अशा दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीत रिक्षा अडकून पडतात. गावदेवी ते लोकमान्य नगर या मार्गावर प्रति प्रवासी २० रुपये भाडे दर आकारले जात असे एकू एका फेरीचे केवळ ६० रुपये रिक्षा चालकाला मिळत. त्यामुळे या कोंडीत अडकून राहिले तर, वेळ आणि इंधन खर्च होतो. म्हणून अनेक रिक्षा चालक सायंकाळच्या वेळी रिक्षा लवकर बंद करत. तर, काही रिक्षा चालक गावदेवी ते नितीन कंपनी किंवा ज्ञानेश्वर नगर पर्यंत प्रवासी वाहतूक करतात.
परंतू, रिक्षा मीटरच्या दरवाढी नंतर शेअर रिक्षाचे दर देखील वाढवले पाहिजे. यासाठी गेले काही महिन्यांपासून शेअर रिक्षाचालक रिक्षा संघटनेसोबत चर्चा करत होते. परंतू, त्यांना संघटनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत आणि रिक्षा बसलेल्या ज्यादा प्रवासी वाहतूकीचा दंड लक्षात घेऊन शेअर रिक्षा चालकांनी रिक्षा संघटनेला विश्वासात घेऊन प्रति प्रवासी भाडे दरात वाढ केली. गावदेवी ते लोकमान्य नगर आणि यशोधन नग पर्यंतच्या मार्गावर प्रति प्रवासी २० रुपये भाडेदर आकारले जात होते.
आता, यात १५ जून पासून ५ रुपयांनी वाढ करण्यात आली असून प्रति प्रवासी २५ रुपये भाडे दर आकारले जात आहे. या भाडेवाढीनंतर तरी, सायंकाळच्या वेळी रिक्षा उपलब्ध होतील अशी आशा प्रवाशांना होती. परंतू, प्रवाशांची ही आशा फोल ठरली आहे. अजूनही प्रवाशांना सायंकाळच्या वेळी अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने रिक्षा उपलब्ध होत आहेत. यामुळे प्रवासी वर्गात नाराजी पसरली आहे.