कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने १५ ऑगस्ट रोजी प्राण्यांची कत्तल आणि मांस विक्रीवर बंदी घातली होती. याविषयावरून राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राज्य शासनाला या आदेशाची दखल घ्यावी लागली. पालिकेच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड १५ ऑगस्ट रोजी सर्व प्रकारचे बंदी हुकूम मोडून कल्याणमध्ये जय मल्हार हाॅटेलमध्ये तिखट भोजनाचा स्वाद घेण्यासाठी आले होते. त्याच हाॅटेलमध्ये शनिवारी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी येऊन भोजनाचा स्वाद घेतला.

भोजनानंतर आमदार रोहित पवार यांनी शिवाजी चौकातील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना शाखेत जाऊन स्थानिक शिवसेना पदाधिकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार पवार यांनी रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडीचा विचार करून कल्याण रेल्वे स्थानकातून पुणे येथे जाणे पसंत केले. मतचोरीच्या विरोधात शनिवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे, मनसे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) आणि काँग्रेसचा मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चानंतर आमदार रोहित पवार यांनी कल्याण परिसरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर कल्याण पर्यंत आपल्या वाहनाने प्रवास केला. शिवाजी चौकाजवळील जय मल्हार हाॅटेलमध्ये तिखट भोजनाचा स्वाद घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी सांगितले, बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन मतदार नोंदणी करायची. आणि बनावट आधारकार्डचा वापर करून त्या आधारे मतदानाच्या दिवशी मतदान करायचे. यामुळे बनावट मतदार वाढला आहे. ही मतचोरी रोखण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला. भाजप नेत्यांना ते काय बोलतात ते काही कळत नाही. आम्ही भाजपला काही सांगत नाही आम्ही निवडणूक आयोगासमोर मतचोरीप्रकरणी घडत असलेले प्रकार उघड करत आहोत. त्याची त्यांनी गंभीरपणे दखल घ्यावी ही आमची मागणी आहे, असे आमदार पवार यांनी सांगितले.

सन २०१९ ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत दरमहा मतदार वाढले. याच कित्त्याने २०२४ ते विधानसभा निवडणुकीपर्यंत ५२ लाख मतदार वाढले आहेत. ऑनलाईन पध्दतीने बनावट मतदारांची नोंदणी करायची. त्याची कसलीही खातरजमा करायची नाही. आणि याच बनावट मतदारांच्या नावे बनावट आधारकार्ड वापरून मतदानाच्या दिवशी मतदान करायचे या विशिष्ट कित्त्याने मतदान वाढवून मतचोरी केली जात आहे. या कित्त्याच्या विरोधात आम्ही आहोत. हा प्रकार आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत आहोत, असे आमदार पवार यांनी सांगितले.

गरीबांच्या हिताचे काम संविधान, लोकशाही करते. या लोकशाही, संविधानाच्या विरोधात कोणी काम करत असेल. पैसे घेऊन मतदान करत असेल आणि त्यांच्यावर शासन, पोलीस यंत्रणा कारवाई करत नसेल तर लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही दंडुके घेतल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.