ठाणे : आरटीई अंतर्गत होणाऱ्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला १४ जानेवारीपासून सुरुवात झाली. हे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. आताही मुदत वाढविण्यात आली असून २ फेब्रुवारी पर्यंत बालकांना अर्ज करता येणार आहे. १४ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील ३१ हजार ७०४ बालकांचे आरटीई प्रवेशाचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

समाजातील वंचित, दुर्बल आणि सामाजिक तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेता यावे याकरिता आरटीई कायद्या अंतर्गत २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. शैक्षणिक वर्षे २०२५ – २६ करिता आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती आणि महापालिका क्षेत्रातील ६२७ शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या असून ११ हजार ३२० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रवेश प्रक्रियेसाठी १४ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत ३१ हजार ७०४ बालकांचे आरटीई प्रवेशाचे अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतू, या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी, बालकांच्या पालकांना २ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी या प्रवेश प्रक्रियेसाठी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी पालकांना केले आहे.