कल्याण : चेहरा विरहित (फेसलेस) प्रणालीच्या माध्यमातून शिकाऊ वाहन परवाना घेण्याच्या प्रक्रियेत गैरप्रकार वाढू लागल्याने परिवहन विभागाने या प्रणालीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने आपल्या कार्यालयात उमेदवाराने वाहन चालविण्याच्या चाचण्यांची आवश्यक परीक्षा पास होणे आणि त्यानंतरच्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर संबंधित उमेदवाराला वाहन चालविण्याची तात्काळ शिकाऊ अनुज्ञप्ती (परवाना) दिली जाईल, अशी माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.

नागरिकांना घर बसल्या ऑनलाईन माध्यमातून शिकाऊ वाहन परवाना काढता यावा म्हणून परिवहन विभागाने दोन वर्षापूर्वी चेहरा विरहित (फेसलेस) प्रणालीची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली. सुरुवातीला या प्रणालीचा नागरिकांचा चांगला उपयोग करून घेतला. अलीकडे या प्रणालीचा चुकीचा पध्दतीने गैरवापर केला जात असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

अनेक तरूण, तरूणी, काही नागरिक या प्रणालीच्या माध्यमातून आपले आधारकार्डवरील वय, नाव, पत्ता यामध्ये फेरफार करून शिकाऊ वाहन परवाना काढत असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. शिकाऊ वाहन परवाना काढलेल्या काही तरूणांकडून दुचाकी वाहन चालविताना अपघात झाले. त्यावेळी शिकाऊ वाहन परवाना काढताना तरूणांनी वय, पत्ता यामध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आले. अशाप्रकारे चेहरा विरहित प्रणालीतून नियमबाह्य पध्दतीने शिकाऊ वाहन परवाने काढण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून राज्याच्या परिवहन विभागाकडे येत होत्या.

या सर्व तक्रारींचा विचार करून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चेहरा विरहित प्रणालीच्या माध्यमातून शिकाऊ वाहन परवाना काढण्याच्या प्रणालीला तात्पुरती स्थगिती दिली. शिकाऊ वाहन परवाना घेण्यासाठी उमेदवारांना आता जवळच्या आरटीओ कार्यालयात जाऊन तेथील स्थायी पध्दतीची आवश्यक परीक्षा देऊन उमेदवाराला शिकाऊ वाहन परवाना मिळणार आहे.

चेहरा विरहित प्रणालीतून शिकाऊ वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेला शासनाने स्थगिती दिल्याने कल्याण आरटीओ कार्यालयाने शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी ऑनलाईन परीक्षा केंद्र, त्या परीक्षेचा तात्काळ निकाल लावून उमेदवारांना तात्काळ शिकाऊ वाहन परवाना देण्याची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशी माहिती कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.