रिक्षाचालकांच्या गुन्हेगारी वृत्तीला चाप बसवण्याच्या हेतूने तसेच अशा प्रकारची घटना घडल्यानंतर गुन्हेगाराला शोधून काढण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना स्मार्ट कार्ड दिले आहे. या स्मार्ट कार्डवरील माहिती देण्यासाठी प्रवाशांना ‘सेफ जर्नी’ अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरत असून त्याचा वापर करण्यासाठी ठाण्यातील सामाजिक संस्थांनी जनजागृती सुरू केली आहे. त्या संदर्भात ठाण्यातील विविध भागांमध्ये या अ‍ॅप्लिकेशनचा प्रचार करण्यात आला.
ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, जिवाशी साहाय्य संस्था, कळवाचे संस्थापक सचिन भगत, सुधीर शर्मा आणि ठाणे वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहर परिसरात ‘सुरक्षित ऑटोरिक्षा प्रवास’ ही विशेष जनजागृती मोहीम ठाणे स्टेशन परिसर, जांभळी नाका, विवियाना मॉल, मुलुंड चेकनाका, कळवा नाका येथे गेल्या आठवडाभरापासून राबविण्यात येत आहे. रिक्षाचालक व प्रवासी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत, असे केळकर म्हणाले. या वेळी वागळे इस्टेटचे पोलीस निरीक्षक मदन पाटील, पोलीस निरीक्षक हनुमंत क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. ‘सेफ जर्नी’ अ‍ॅप्सच्या माध्यमाने प्रवासी अशा प्रसंगी रिक्षाचालकाची माहिती आपल्या कुटुंब, मित्रमंडळी आणि पोलिसांनाही पाठवू शकतात, अशी माहिती या मोहिमेद्वारे देण्यात आली.