डोंबिवलीः ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी बंद असल्याने सध्या डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर आणि कल्याण येथील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर येथे नाटकांच्या प्रयोगांची मोठी मेजवानी मिळत होती. तोच २३ मे रोजी रात्री सावित्रीबाई फुले कलामंदिरात छताचा तुकडा अचानक तुटून पडला आहे. त्यामुळे आता सावित्रीबाई फुले कलामंदिर पुढील आदेशापर्यंत देखभाल दुरूस्तीच्या तात़डीच्या कामासाठी बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे ऐन हंगामात नाट्यकर्मी आणि रसिकांचा हिरमोड होणार आहे.

सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहरात अठरा वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले कला मंदिर हे नाट्यगृह सुरू झाले. डोंबिवलीतील नाट्य चळवळ आणि रसिकांच्या प्रतिसादामुळे डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह कायमच नाटकांच्या गर्दीत पाहायला मिळते. अनेकदा सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हाऊसफुलचा फलक लागलेला असतो. अनेक नाट्य निर्माते सावित्रीबाई फुले नाट्यगृह नोंदणी करण्यासाठी येथे धाव घेत असतात.

गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेले राम गणेश गडकरी रंगायतन देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. त्यामुळे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह आणि कल्याण येथील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे नाट्यगृहामध्ये नाटकांची मोठी गर्दी होते आहे. ठाणे आणि आसपासच्या नाट्य रसिकांसाठी डोंबिवलीचे नाट्यगृह जवळ आहे. मोठागाव मानकोली खाडी पुलाच्या उभारणीनंतर ठाणे ते डोंबिवली असा प्रवास अवघ्या काही मिनिटांवर आला आहे. गडकरी रंगायतन बंद असणे सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पथ्यावर पडले होते. मे महिन्यात अनेक मोठी नाटके आणि प्रसिद्ध कलाकार डोंबिवली यानिमित्ताने आले होते. आताही अनेक नाटकांची मोठी यादी प्रतीक्षेत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र २३ मे रोजी अचानक सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरातील छताचा तुकडा अचानक तुटून खाली पडला. रात्रीची वेळ ही घटना झाली. याची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी समक्ष जाऊन नाट्यगृहाची पाहणी केली आणि संरचनात्मक अभियंत्यांना लेखापरीक्षण अहवाल देण्याबाबत निर्देश दिले. संरचनात्मक लेखापरीक्षणानंतर नाट्यगृहातील छताचे सिलिंगचे सांगाडे गंजलेले आणि कमकुवत झाले असल्याचे समोर आले. त्यामुळे याची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी तातडीच्या दुरुस्ती कामासाठी मंजुरी दिली. त्यामुळे आता सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद राहणार असून रंगकर्मी आणि नाट्य रसिकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. या निर्णयामुळे सुट्टीच्या काळात नाट्य निर्माते आणि रसिकांचा निर्मूल होणार आहे.