ठाणे : ठाण्यातील एका इंग्रजी माध्यम शाळेच्या तीन विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक प्रकल्प आता थेट युरोपपर्यंत पोहोचला आहे. लक्झेम्बर्ग या युरोपियन देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्मार्ट वे टू चेक कार्बन इमिशन कॉज बाय व्हेहिकल्स’ या प्रकल्पाची निवड झाली आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने शाळेतील तीन विद्यार्थी २७ ऑक्टोबर रोजी लक्झेम्बर्गकडे रवाना होणार आहेत. २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत हे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पार पडणार आहे. यावेळी भारतीय विद्यार्थी परदेशात जाऊन वैज्ञानिक प्रकल्पासोबतच आपल्या संस्कृतीची देखील देवाणघेवाण करणार आहेत.

आपल्या शाळेतील विद्यार्थी भविष्यात उच्च स्तरावर पोहोचावेत, यासाठी प्रत्येक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन सतत प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवले जातात. तसेच विद्यार्थ्यांकडून स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेण्यावरही भर दिला जातो. ठाण्यातील अशाच एका शाळेने अनोखा उपक्रम राबवित विद्यार्थी आणि पालकांची मने जिंकली.

ठाण्यातील नौपाडा भागात असलेल्या विद्या प्रसारक मंडळ संचलित ए.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी परदेशात जाऊन भारतीय संस्कृतीची देवाणघेवाण करणार आहेत. या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्मार्ट वे टू चेक कार्बन इमिशन कॉज बाय व्हेहिकल्स’ या प्रकल्पाची निवड झाली आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा अभिनव प्रकल्प विद्यार्थ्यांनी डॉ. सुधाकर आगरकर आणि विज्ञान शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली साकारला आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने शाळेतील आर्यन म्हात्रे, अनिश बर्वे आणि सोहम बेडेकर हे तीन विद्यार्थी २७ ऑक्टोबर रोजी लक्झेम्बर्गकडे रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत शाळेच्या शिक्षिका देखील असतील. २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत हे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पार पडणार आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना या देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थळांची भेट घडवून दिली जाणार आहे.

दुसऱ्या दिवशी विज्ञान प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होईल. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात भारतीय विद्यार्थी “अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं” हे प्रसिद्ध भजन सादर करून भारतीय संस्कृतीची झलक दाखवतील. तसेच “इंटरनॅशनल स्नॅक्स शेअरिंग” या उपक्रमात करंजी, शंकरपाळी, चकली आणि लाडू या पारंपरिक पदार्थांची मेजवानी परदेशी विद्यार्थ्यांना देणार आहेत. यावेळी वैज्ञानिक तंत्रज्ञानाने समृद्ध असा हा प्रकल्प केवळ आपल्या देशापुरता सीमित न ठेवता जागतिक स्तरावरील प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्याच्या उपयोगी होईल या हेतूने शाळेने या विद्यार्थ्यांना असा प्रकल्प तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, असे शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. अस्मिता मोहिले यांनी सांगितले. याआधीही या शाळेच्या नावावर अनेक अनोखे उपक्रम आहेत. काही दिवसांपूर्वी इस्रायलमधील तरुणांनी या शाळेला भेट देऊन शिक्षणपद्धतीचे कौतुक केले होते. आता मात्र हीच शाळा ठाण्यापासून थेट युरोपात आपला ठसा उमटवणार आहे.