ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर केंद्र तसेच राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या महिनाभरात ब्रिटनवरून आलेल्या प्रवाशांवर आरोग्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने अशा ३२८ प्रवाशांची यादी ठाणे जिल्ह्य़ातील महापालिका तसेच ग्रामीण आरोग्य यंत्रणांना पाठविली आहे. त्यानंतर सर्वच महापालिका आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणांनी प्रवाशांची शोधाशोध सुरू केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच १३४ प्रवासी ठाणे शहरातील असून त्यापाठोपाठ नवी मुंबईतील ६१ प्रवासी आहेत. सर्वात कमी म्हणजेच चार प्रवासी ठाणे ग्रामीण भागातील आहेत. यानिमित्ताने महापालिका यंत्रणांची पुन्हा धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे.
ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळल्याने जगभरात चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये गेल्या महिनाभरात म्हणजेच २५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालवधीत ब्रिटनमधून भारतात आलेल्या सर्व लोकांच्या चाचण्या करण्याचे तसेच आरोग्य आढावा आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी केंद्र शासनामार्फत अशा प्रवाशांची राज्य शासनाला यादी पाठविण्यात आली असून त्याआधारे राज्य शासनाने राज्यातील महापालिक, नगरपालिका आणि ग्रामीण यंत्रणांना यादी पाठविली आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्य़ात गेल्या महिनाभरात ब्रिटनवरून ३२८ प्रवासी आल्याची बाब समोर आली आहे.
ब्रिटनवरून महिनाभरात आलेले प्रवासी
पालिका प्रवासी
ठाणे १३४
नवी मुंबई ६१
कल्याण-डोंबिवली ४७
भिवंडी ८
उल्हासनगर १४
अंबरनाथ १४
बदलापूर ६
मिरा-भाईंदर ४०
ठाणे ग्रामीण ४
एकूण ३२८
गेल्या महिनाभरात ब्रिटनवरून आलेल्या ३२८ प्रवाशांची यादी राज्य शासनाने पाठविली असून त्याआधारे या प्रवाशांशी संपर्क साधून त्यांचा आरोग्य आढावा घेण्यासोबत चाचण्या करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळून आली तर त्यांच्यावर राज्य शासनाच्या नियमावलीप्रमाणे उपचार करण्यात येणार आहेत.
– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे