ठाणे – मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल असलेल्या आईचे औषध आणण्यासाठी गेलेला एक १० वर्षीय मुलगा आठ दिवस आईपासून दुरावल्याची घटना समोर आली आहे. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी आठ दिवस शोध मोहीम राबवित त्याच्या आईचा शोध घेऊन दोघांची नुकतीच भेट घडवून आणली आहे. मात्र मुलाची देखभाल करण्यासाठी आई व्यतिरिक्त कोणी नसल्याने आणि त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरु असल्याने ठाणे बाल संरक्षण विभागाने तात्पुरत्या स्वरूपात जिल्ह्यातील शासकीय बालगृहात त्याची रवानगी केली आहे.
डोंबिवली येथील भोपरगाव परिसरात सोहम माने हा दहा वर्षीय मुलगा आपल्या आईसमवेत राहतो. मागील आठ दिवसांपूर्वी दिवसांपूर्वी एका घटनेत सोहमची आई सुप्रिया माने यांचा पाय जायबंदी झाला होता. उपचारासाठी त्या सायन येथील रुग्णालयात दाखल होत्या. त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी लागणारी औषध घेण्यासाठी सोहम हा मेडिकलच्या शोधात बाहेर पडला. मात्र बराच वेळ झाल्यावरही सोहम परतला नसल्याने आईला चिंता वाटू लागली. मात्र स्वतः जायबंदी असल्याने सुप्रिया यांना तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाता आले नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी पतीशी वादविवाद झाल्याने त्या विभक्त राहत असल्याने संपर्क साधण्यास देखील कोणी नव्हते. मात्र सुदैवाने रुग्णालयापासून काही किलोमीटर अंतावर सोहम हा सायन पोलिसांना आढळून आला. त्याची विचारपूस केली असता तो घाबरला असल्याने त्याने कोणतीच माहिती पोलिसांना दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी मुंबई येथील एका बालगृहात त्याची लागलीच रवानगी केली. तब्बल तीन दिवसांनंतर सोहम याने पोलिसांना आपण डोंबिवली येथील भोपरगाव परिसरात राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ठाणे शहर बालसंरक्षण शाखेच्या पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार ठाणे पोलिसांनी सोहमच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. या दरम्यान त्याची आई सायन रुग्णालयात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सुप्रिया माने यांची सायन रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया यांनी सविस्तर घटना पोलिसांना सांगितली. जायबंदी असल्याने आणि कुटुंबातही कोणी नसल्याने तक्रार करता आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी सोहम आणि त्याची आई यांची भेट नुकतीच घडवून आणली. मात्र सुप्रिया यांच्यावर अजूनही उपाय सुरु असल्याने सोहमच्या देखभालीसाठी कोणी नसल्याचे लक्षात घेऊन पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी त्याची रवानगी शासकीय बालगृहात केली आहे.
