अंबरनाथः अंबरनाथजवळील जांभूळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रतिबंधीत परिसरातून ३३ लाख ५६ हजारांच्या महाकाय वाहिन्या चोरण्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्याच दोन सुरक्षा रक्षकांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चोरीचा मुख्य सुत्रधार याच भागात असलेला एक भंगारवाला असून त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने आणि या एमआयडीसीच्या सुरक्षा रक्षकांच्या सहकार्याने ही चोरी केली. या एकूण सहा जणांना कल्याण ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांना ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची तहाण भागवणाऱ्या बारवी धरणातून सोडलेले पाणी गुरूत्वाकर्षणाने बारवी नदीतून उल्हास नदीला येऊन मिळते. येथे आपटी बंधाऱ्यावरून उचललेले पाणी जांभूळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. पुढे ते मोठ्या जलवाहिन्यांच्या माध्यमतून विविध शहरांना, औद्योगिक वसाहतींना पाठवले जाते. हा अतिसंवेदनशील परिसर असून प्रतिबंधित क्षेत्रात मोडतो. येथे चोख सुरक्षा व्यवस्था असते.
मात्र या चोख सुरक्षेतूनही या भागातून तब्बल ३३ लाख ५ हजारांच्या भल्या मोठ्या अशा सहा वाहिन्या चक्क चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सुमारे साडे सात फुट व्यासाच्या वाहिन्या चोरीला जाताना कुणाला दिसल्या कशा नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. चोख सुरक्षेतून कुणाच्या आशिर्वादाने या वाहिन्या चोरीला गेल्या असा संशय व्यक्त होत होता. याप्रकरणी कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे फिरली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा कर्मचारी, त्यांच्या हालचाली, कामाच्या वेळा, मोबाईल रेकॉर्ड अशा सर्व तांत्रिक बाबींचे सखोल विश्लेषण करून सहा आरोपी निश्चित केले. धक्कादायक म्हणजे यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दोन सुरक्षा रक्षकच सामिल असल्याची बाब समोर आली आहे. कल्याण ग्रामीण पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि तांत्रिक कौशल्य वापरून या वाहिन्या चोरांना जेरबंद केले आहे. दोन भंगारवाले, त्यांचे दोन सहकारी आणि दोन सुरक्षा रक्षक अशा सहा जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशी झाली चोरी भंगारवाले, त्यांचे साथीदार आणि एमआयडीसीचे सुरक्षा रक्षक या सर्वांनी मिळून ही चोरी केली. बदलापूरचा रहिवासी आणि स्थानिक भंगारवाला असलेला सुल्तान उर्फ पप्पू शेख याने उल्हासनगर येथील एक भंगारवाला आणि अन्य दोन साथीदारांच्या मदतीने वाहिन्या चोरीचा टक रचला. अक्रम खान असे एका साथीदाराचे नाव आहे. शेख याने सुरक्षा रक्षक ज्ञानेश्वर तुपे आणि विश्वास म्हात्रे या दोन सुरक्षा रक्षकांचे मन वळवून त्यांना यात सामील करून घेतले, अशी माहिती कल्याण ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. वाहिन्या कापून त्या नेत असताना अनेकदा या प्रतिबंधित क्षेत्रात भंगारवाला आणि त्याच्या साथीदारांचा वावर होता. मात्र त्यांच्याकडे या दोन्ही सुरक्षारक्षकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे या सुरक्षारक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे. त्यांना कुण्या मोठ्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त तर नाही ना याचीही तपासणी होण्याची गरज आता व्यक्त होते आहे.