ठाणे – अंमली पदार्थांचे सेवन माणसाला हळूहळू मृत्यूच्या दिशेने नेत असते. यासाठी पैसे उपलब्ध झाले नाही तर माणसाला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे नेण्यास भाग पाडते, असे स्पष्ट प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल म्हस्के यांनी केले. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व्याख्यान सत्रात ते बोलत होते.

दरवर्षी २६ जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने २३ ते २८ जून या कालावधीत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २३ जून रोजी ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात वरिष्ठ पोलिस निरिक्षक विशाल म्हस्के यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावीत, सहाय्यक पोलिस निरीक्षक निखिल भोसले आणि कॉज फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जगदीश गावीत यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे मुलांमध्ये वाढणारी मानसिक विकृती आणि गुन्हेगारी याचे भयावह वास्तव समोर मांडले. शायरीच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तसेच कल्पना मोरे यांनी विद्यार्थिनींना स्व-सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर परिचयातील व्यक्तींवर अतिविश्वास ठेवल्यामुळे अनेक वेळा मुलींना नकळत अंमली पदार्थ दिले जातात, त्यामुळे कोणतेही पेय घेताना ते सीलबंद असल्याची खात्री करावी, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.